• Mon. Nov 25th, 2024

    वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी

    ByMH LIVE NEWS

    May 14, 2023
    वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी

    अकोला, दि.14(जिमाका)-  समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी केली. या घटनेत मयत व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

                जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेच्या पाहणी दरम्यान श्री. महाजन बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.

                 श्री. महाजन यांनी जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किल्ला चौक, हरिहर पेठ, हमजा व सोनटक्के प्लॉट या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बाधित परिवारास आर्थिक मदतीसह सर्व सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी जुने शहर पोलिस स्टेशन येथे दंगल परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी, असेही निर्देशही श्री. महाजन यांनी दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed