• Mon. Nov 25th, 2024

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

    ByMH LIVE NEWS

    May 14, 2023
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

    पुणे दि.१४-  राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलता व शासनाच्या विविध विभागांच्या कार्यतत्परतेमुळे परभणी तालुक्यात भाऊचा तांडा येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अवघ्या काही तासांतच ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासनाने मंजूर केले आहे. 

    सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायती अंतर्गत भाऊचा तांडा  येथील शेतामधील सेप्टिक टॅंकची सफाई करताना दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना  ११ मे २०२३ रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांनी मुख्यमंत्री यांना अवगत केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार काही तासातच शासकीय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

    मृत पावलेल्या एकूण ५ सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य अदा करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक व्यक्ती १० लाख याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचा निधी १२ मे २०२३ च्या  शासन  निर्णयानुसार मंजूर केला आहे. 

    सद्यस्थितीत सदर मंजूर केलेल्या निधीचा पहिला हप्ता प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे रुपये २५ लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी लवकरच सदर मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना मिळणार आहे. 

    हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरून काम करताना मृत्यू झालेल्या मॅन्युअल स्कॅवेंजर यांच्या वारसांना रुपये १० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. 

    जिल्हाधिकारी परभणी यांनी १२ मे रोजी समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने  मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी समाज कल्याण विभागास तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कल्याण विभागाचे सचिव  सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी यावर तात्काळ पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed