• Mon. Nov 25th, 2024
    नाशिकच्या रुग्णालयात पेशंटवर जात विचारुन उपचार, केसपेपरमध्ये जातीचा रकाना; अजित पवार संतापले

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधात असून, यातून राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते’, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला. ‘शासकीय अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाता कामा नये’, असे नमूद करतानाच मनमाडसह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरू असतील तर ते तत्काळ थांबविण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली.

    शेतकरी हीच आमची जात, खतखरेदी करताना जात सांगण्याची गरज काय? अजित पवारांचा संताप

    ‘उत्तर महाराष्ट्रात मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या केसपेपरमध्ये जातीचा रकाना आहे. त्यात जात लिहिणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. रुग्णांना त्यांची जात विचारून नंतर उपचार करण्याचा प्रकार प्रशासनाची आजारी मानसिकता दाखवणारा आहे’, अशी टीका पवार केला. तसेच, या प्रवृत्तीला त्यांनी प्रखर विरोध केला.

    खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगण्याची सक्ती; विधानसभेत गदारोळ, कृषी विभागाचं स्पष्टीकरण

    ‘सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी’

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठीही जात सांगणे अलिकडे बंधनकारक केले होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ‘अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी गरज नसताना नागरिकांची जात विचारण्याचा घटना वाढत आहेत. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन हे प्रकार थांबवावेत. समाजात जातीभेद निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊ नये’, असे आवाहन पवार यांनी सरकारला केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *