• Fri. Mar 13th, 2026

    Pune Gas Cylinder News: पुणेकरांवर संकट! घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळेना; हॉटेल, खाणावळींवरही मोठा परिणाम

    Pune Gas Cylinder News: पुणेकरांवर संकट! घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळेना; हॉटेल, खाणावळींवरही मोठा परिणाम

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: आखाती देशांतील युद्धाचा थेट परिणाम सर्वसामान्य पुणेकरांच्या दैनंदिन जगण्यावर झाला आहे. स्वयंपाकघरातील सिलिंडर मिळणे तर दूरच; पण तो नोंदविण्यासाठी (बुकिंग) संघर्ष करावा लागतो आहे. अवघ्या आठवड्यात युद्धाची धग घराघरापर्यंत पोहोचल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सिलिंडर मिळण्यासाठी सुरू असलेली ससेहोलपट थांबवावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

    अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट फटका आता सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे घरांमध्ये आणि व्यवसायांना बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिलिंडर नोंदविण्यामध्येच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काही ठिकाणी सिलिंडर नोंदविण्यासाठीच्या संपर्क क्रमांकावरून काही प्रतिसादच मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा नागरिकांनी सिलिंडर घेऊन थेट गॅस एजन्सी गाठल्याने शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी सिलिंडरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गॅस एजन्सीकडे आवश्यक सिलिंडरचा साठा नसल्याने नागरिकांना उन्हामध्ये ताटकळत थांबावे लागते आहे. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबविला असला, तरी घरगुती सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत, असा दावा सरकारकडून केला जात असला, तरी घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांना खटाटोप करावे लागत आहेत.

    ८० टक्के हॉटेल बंद पडण्याची भीती

    केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्याने पुणे शहरातील बहुसंख्य हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी; तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यावसायिकांकडे केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरल्याने येत्या काही दिवसांत पुण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद पडण्याची भीती आहे.

    शाकाहारी हॉटेलांना फटका

    ‘१० टेबलांच्या हॉटेलला दिवसाला किमान एक सिलिंडर लागतो. व्हेज हॉटेलमध्ये मसाला डोसा, उत्तप्पा, स्पंज डोसा यांसारख्या पदार्थांसाठी गॅसचा वापर अधिक असतो. सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत तवा सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त साठा ठेवावा लागतो; पण दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवणे शक्य नाही. सध्या आमच्याकडे तेवढाच साठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे,’ अशी भीती पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी व्यक्त केली.

    उलाढालीवर गंडांतर

    गॅस उपलब्ध असेपर्यंत हॉटेल सुरू राहतील. मात्र, साठा संपल्यानंतर दोन-तीन दिवसांत अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगासह वडापाव, चायनीज, अमृततुल्ये आणि इतर व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती आहे.

    खाणावळींवरही परिणाम

    ‘गॅसपुरवठा कमी होत असल्याने आम्ही वापर मर्यादित करत आहोत. भाकरी देणे बंद करून चपाती देण्यास सुरुवात केली आहे. गॅस उपलब्ध नसेल, तर खाणावळी बंद कराव्या लागतील. त्यामुळे आमचे नुकसान होईलच; पण विद्यार्थी, नोकरदार आणि कामगारांचेही हाल होतील,’ असे खाणावळचालक संजय गवळी यांनी सांगितले.

    गॅसपुरवठा बंद झाल्याने बाजारात दर वाढू लागले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दोन दिवसांपूर्वी १७५५ रुपये दर होता. तो आता १९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ‘दर वाढले तरी लगेच खाद्यपदार्थांचे दर वाढवता येत नाहीत. वर्षातून एकदाच दरवाढ करता येते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,’ असे नैवेद्यम हॉटेलचे संचालक राजेश शेट्टी यांनी सांगितले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *