गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांची मतमोजणी आज पार पडली. याचवेळी एका उमेदवाराने आक्षेप घेतल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला होता. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये एका उमेदवाराची मताची बेरीज लावणे बाकी होते. अशातच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांची मतमोजणी केंद्रामध्ये एंट्री झाली. त्यानंतर कार्यकर्ते मी तुला बघून घेतो म्हणत एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या खांद्यावर टाकून त्यांना बाजूला नेले. या ठिकाणी दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या हा सर्व प्रकार पाहून मतदान केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कार्यकर्ते एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून गेल्यानंतर आजी-माजी आमदारांमध्ये गप्पा रंगल्यामुळे यालाच राजकारण म्हणतात अशी चर्चा या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली.
परभणीच्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडली होती. आज सकाळी १८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनल मधील सात जणांचा विजय झाला तर महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या आणि त्यांनी बाजार समितीवर ताबा मिळवला. मात्र, भाजपच्या पॅनल मधील एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्या वडिलांचा देखील सहा मतांनी पराभव झाला, त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला.