महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खारघरच्या मैदानावर तब्बल दहा ते बारा लाखांची गर्दी झाली होती. यापैकी १३ श्री सदस्यांचा उष्माघात आणि निर्जलीकरणामुळे (Dehydration) मृत्यू झाला आहे. काही श्री सदस्यांवर अजूनही नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. विरोधक या दुर्घटनेसाठी सरकारचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत आहेत. तर सरकारकडून ही दुर्घटना केवळ वाढलेल्या तापमानामुळे घडल्याचे सांगितले जात आहे.
खारघर दुर्घटनेवर अमित शाहांची प्रतिक्रिया
खारघर दुर्घटनेत अनेक श्रीसेवकांचे मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले. यामध्ये विरोधकांनी अमित शाह यांना मध्ये खेचत त्यांच्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला. त्यानंतर अमित शाह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु, सोमवारी अमित शाह यांनी खारघर दुर्घटनेवर भाष्य केले. या घटनेमुळे मला दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जे उपचार घेत आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊ दे, असे अमित शाह यांनी म्हटले.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात सूर्य कोपला
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या दिवशी मुंबई आणि लगतच्या क्षेत्रात उष्मा निर्देशांक ४० ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. तापमान आणि आर्द्रतेचा एकत्रित परिणाम दर्शवणारा ‘उष्मा निर्देशांक’ (हिट इंडेक्स) धोकादायक पातळीत असताना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास हवेच्या प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारे तापमान जास्त असते. हवेत आर्द्रता जास्त असल्यास शरीरातून घाम बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते. घाम कमी आल्यामुळे शरीराचे तापमान वाढत जाऊन श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.