शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने (Dehydration) आणि उष्माघात या दोन कारणांमुळे श्रीसेवकांचा जीव गेला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतानाचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी याठिकाणी लाखोंची गर्दी जमेल, असा अंदाज होता. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून खारघरच्या मैदानावर राज्य सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नियोजन सुरु होते. या नियोजनानुसार मैदानाच्या एका बाजूला श्रीसेवकांना पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो नळांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी मैदानात तात्पुरती पाण्याची लाईन टाकण्यात आली होती. परंतु, हे सर्व नळ मैदानाच्या एकाच बाजूला उभारण्यात आले होते.
पुरस्कार प्रदान सोहळा आणि सर्व वक्त्यांची भाषणे संपेपर्यंत श्रीसेवक एकाच जागी बसून होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पाहण्यासाठी श्रीसेवक एकाच जागी बसून राहिले. त्यामुळे कार्यक्रम संपताच तहानलेल्या श्रीसेवकांनी पाणी पिण्यासाठी धाव घेतली. साहजिकच कार्यक्रम संपल्यानंतर पाणी पिण्यासाठी श्रीसेवकांची एकाच बाजूला मोठी गर्दी झाली. अशातच प्रचंड उष्णतेने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या जलवाहिनीतील पाईप तापले. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात या नळांमधून गरम पाणी येऊ लागले. या पाण्यामुळे श्रीसेवकांची तहान काही भागत नव्हती. तेव्हा या श्रीसेवकांनी काही मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टँकरमध्ये थंड पाणी असेल, या भावनेने तिकडे धाव घेतली. परिणामी याठिकाणी मोठी गर्दी होऊ अनेक श्रीसेवकांची प्रचंड घुसमट झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याशिवाय, नळांमधून गरम पाणी येत असल्यामुळे अनेकांनी पाणी न पिणेच पसंत केले. सगळ्या गोंधळामुळे अनेक श्रीसेवकांना पाणीच मिळाले नाही आणि गर्दीत घुसमटही झाली. या दोन कारणांमुळे श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास अधिक जाणवला. याऐवजी श्रीसेवकांना बसल्या जागेच्या आसपास पाणी उपलब्ध झाले असते तर इतका गोंधळ झाला नसता, असे मत अनेकांनी व्यक्त केले.