लोकसभा निवडणुकांना जेमतेम वर्षच उरल्याने त्यादृष्टीने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यातील ३५ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. केंद्रातही शिवसेना भाजपसोबत असल्याने त्यांच्या खासदारांचा भाजपला पाठिंबा होता. मात्र, आता शिवसेना सोबत नसल्याने त्यांच्याशिवाय राज्यात पुन्हा तेवढेच वा त्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणणे हे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. त्यात राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी बनली असून त्यांनी या आव्हानामध्ये अधिक भर घातली आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी कोणत्याही परिस्थितीत भाजपला फोडायची असून त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी आवश्यक ती सर्व बोलणी त्यांनी केल्याचे समजते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मात्र यासंबंधीची कोणतीच कल्पना भाजपकडून देण्यात आली नसल्याचेही समजते.
या आमदारांचे नेतृत्व कोण करेल याबाबतची अमित शहा यांनी चाचपणी केली असून संबंधित नेत्याच्या मागे किती आमदार येऊ शकतात याचीही त्यांनी खातरजमा केल्याचे समजते. या गटासोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर या गटाला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याचे समजते. त्या गटाला सत्तेत किती वाटा द्यायचा तसेच हा वाटा देताना सध्या भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेत जो काही वाटा दिला आहे त्याचा समतोल कसा साधायचा याविषयी शनिवारी मुंबई भेटीवर असलेल्या अमित शहा यांनी चर्चा केल्याचे समजते. अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांसोबत यासंबंधी चर्चा केल्याचे समजते.
‘मी महाविकास आघाडीसोबतच!’
‘शिवसेनेतून जसे ४० आमदार फोडले गेले, तसाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ शकतो. दुर्दैवाने असे झाले, तरी भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत मी नसेन. मी महाविकास आघाडीसोबतच राहीन’, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलीकडेच झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान दिल्याचे समजते.