कोकण आणि मालेगावात उद्धव ठाकरेंची विराट सभा नुकतीच पार पडली. सर्वसमावेशक हिंदुत्व अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत त्यांनी शिवसैनिकांना साद घातली. पक्ष बांधणी आणि मजबुतीसाठी उद्धव ठाकरेंनंतर आता महिला पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ आवळण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात येणार आहेत, अशी माहिती आहे.
नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे महिला आघाडीत मोठा चेहरा नाही. माजी नगरसेविकाच नाशिकची महिला आघाडी सांभाळत होत्या. मालेगाव येथील सभेत काही महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंसोबत असलेली लोक फोडण्यासाठी शिंदे समर्थकाकंडून नाशकात कसून मेहनत केली जातेय. संजय राऊतांनी अनेकदा तळ ठोकूनही पक्षातील पडझड रोखण्यात म्हणाव तसं यश आलेलं दिसत नाही. त्यामुळं नाशकातील महिला आघाडीच्या बळकटीसाठी रश्मी ठाकरे यांचा महिनाअखेरीस मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. विस्कटलेली संघटनात्मक घडी बसवण्यासाठी मातोश्रीवर प्लॅनिंग सुरु आहे. नाशिक मधील पदाधिकाऱ्यांकडून महिलांच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आहे.
पक्षांचं डॅमेज भरुन काढण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अंबादास दानवेंनी अनेक वेळा नाशिक दौरे केले. परंतु आता उद्धव ठाकरेंनंतर पत्नी रश्मी ठाकरेच मैदानात उतरणार असल्याने दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय.
रश्मी ठाकरेंनी कुटुंब राजकीय रणांगणात असताना घरचा कारभार सांभाळला. राज्यातील कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर येणारा प्रत्येक माणूस, त्यांची कामं याकडे त्या जातीने पाहातात. प्रत्येकाच्या जेवणाची सोय, घरातील नियोजन सांभाळताना त्या विचारपूस करायच्या. शिवसेना आणि शिवसैनिक यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. याचा परिणाम म्हणजे सच्चा शिवसैनिक पक्षाशी बांधून ठेवण्यात उपयोग झाला. मविआ सरकार पडल्यानंतर कुटुंबाला सांभाळण्यात रश्मी यांचा मोठा वाटा आहे. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंसोबत अनेक राजकीय भेटीगाठींमध्ये त्या सक्रीय असतात. वेगवेगळे कार्यक्रम असो वा सुख दु:ख, रश्मी ठाकरे नेहमी हजर असतात.