• Sat. Sep 21st, 2024

विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

ByMH LIVE NEWS

Apr 13, 2023
विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत अहवाल सादर करावा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई दि. १३ :विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत  दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी शेळी-मेंढी गट वाटप योजना राबविण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे शेळी-मेंढी असणे आवश्यक असून, विदर्भ-मराठवाड्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प  (VMDDP) विदर्भ व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात राबविण्यात येत असून, यासाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल सादर करावा.  व्हीएमडीडीपी अंतर्गत खरेदी उपक्रम वाढविण्यासाठी दुध उत्पादन कंपनीची स्थापना करण्याबाबत सकारात्मक विचार करणार.  दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दूग्ध विकास बोर्ड व सहयोगी संस्थांद्वारे कृत्रिमरेतनाची सेवा शेतकऱ्यांना संतुलित पशु खाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पशुखाद्य पुरके पुरवठा, ॲनिमल इंडक्शन याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना व पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड व अन्य संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचेही मंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यासाठी क्षेत्र निश्चित करावे असेही मंत्री श्री.विखे पाटील यानी सांगितले.  या बैठकीस विभागाचे सचिव प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम, स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed