आता इंदोरीकरमहाराज आणि गौतमी पाटील यांच्या वादात ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी गौतमी पाटील आणि इंदोरीकरमहाराज या दोघांना देखील आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. ‘दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावे ठेवतात. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदूरीकर महाराजांनाही नावं ठेवतात. लावणीत पदर ढळू दिला जात नाही, गौतमी करते तशी लावणी नसते’, असे म्हणत मोरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
सदानंद मोरे यांनी लावणीकडे रसिक म्हणून पाहतो असं म्हटलं. कीर्तन परंपरेशी थेट संबंध असल्याचं ते म्हणाले. गौतमी पाटील आणि इंदोरीकरमहाराज यांच्यावर त्यांच्या क्षेत्रातील लोक टीका करतात हा समान धागा असल्याचं सदानंद मोरे म्हणाले. इंदोरीकरमहाराज समाजातील प्रश्नांवर भाष्य करतात, इतर कीर्तनकार ज्या प्रश्नांना भिडत नाहीत त्या प्रश्नांना ते भिडतात असं म्हणत इंदुरीकरांचं सदानंद मोरे यांनी कौतुक देखील केलं.
काही दिवसांपूर्वी इंदोरीकरमहाराजांनी गौतमी पाटील बद्दल नाव न घेता टीका केली होती. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र, लोक तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा होतो. २०० पोरांचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षण देखील दिले जात नाही, असं इंदोरीकरमहाराज म्हणाले होते.
गौतमी पाटील इंदोरीकरमहाराजांबद्दल काय म्हणालेली?
दरम्यान, गौतमी पाटील हिने इंदोरीकरमहाराज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्हाला कोणीही तीन गाण्याचे ३ लाख रुपये देत नाही. आमच्या ग्रुपमध्ये २० मुली काम करतात. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मानधन घ्यावे लागते, असे स्पष्टीकरण गौतमीने दिले होते. आता सदानंद मोरे यांच्या टीकेनंतर इंदोरीकरमहाराज आणि गौतमी पाटील काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.