दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात अंकिताच्या मानेवर, कपाळावर, डाव्या हातावर, पोटावर, बेंबीजवळ अशा ठिकाणी बिबट्याच्या दाताच्या व नखांच्या जखमा आढळून आल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अंकिताचा मृत्यू झाल्याने सकाळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीचा मृतदेह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामार्फत नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील धुमोडी, वेळूंजे, ब्राह्मणवाडे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात आधीच काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांनतर आता पिंपळद येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी यावेळी वन विभागाच्या पथकाला घेराव घातला. वेळोवेळी मागणी करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा जाब गावकऱ्यांनी विचारला. यानंतर वन विभागाने तातडीने उपाययोजना करत पाच पिंजरे मागवत बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी ते बसवले आहेत.