रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलंय?
छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे श्रीमती सुषमा अंधारे यांनी दाखल केली आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत तसेच या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. ‘ती बाई सगळेच माझे भाऊ आहेत म्हणते…. सत्तार माझेच भाऊ आहेत, भुमरे पण भाऊ… पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती…’ अशी अश्लाघ्य आणि हीन टीका संजय शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर केली होती.
तक्रार दाखल झाली नाही, देवेंद्रजी लक्ष द्या.. की आपल्या आशीर्वादानेच हे सगळं सुरू आहे?
दुसरीकडे सुषमा अंधारे तक्रार दाखल करण्यासाठी परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना अंधारे म्हणाल्या, “कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होत नाही. पोलीस कर्मचारी वरिष्ठांना विचारून घेतो असे उत्तर देताहेत. इथे महिला किती सुरक्षित आहेत? देवेंद्रजी आपण याकडे लक्ष द्याल का की हे सगळे आपल्याच आशीर्वादाने चालू आहे?”