हा सगळा धक्कादायक प्रकार ९ जानेवारी २०२२ ते दि ८ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. खेड तहसीलदारांच्या लेखी पत्रानुसार कोंडिवली बौद्धवाडी येथील अतिक्रमण प्रकरणी जागेच्या मोजणीचे काम सायली धोत्रे व त्यांचे सहकारी शिवानंद टोम्पे यांनी २०२० जानेवारी २०२२ व ५ एप्रिल २०२२ रोजी केले. पण गट क्रमांक १०४ चा नकाशा उपलब्ध उपलब्ध होऊ न शकल्याने त्याची मोजणी करण्यात आली नव्हती. या सगळ्या प्रकरणी १५ जण मोजणी केलेल्यांची कागदपत्र व नकाशे सातत्याने मागणी करत होते.
याप्रकरणी मोजणी मान्य नसल्याचे सांगून दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी उपअधीक्षक कृष्णा शिंदे यांच्याकडे फेरमोजणीची मागणी केली. याप्रमाणे शिरस्तेदार राजेंद्र रसाळ व बेजगमवार यांनी जागेची फेरमोजणी केली. याचदिवशी प्रणेश मोरे याने येऊन शिवानंद टोम्पे यांना तुम्ही मोजणी चुकीची केली आहे. तुमच्या मागे तक्रारी अर्ज, उपोषण व पेपरबाजी या गोष्टी होऊ नयेत असे वाटत असेल, तर पक्ष चालवण्यासाठी २५ लाख रुपये द्या, आम्ही सर्व विषय मिटवतो, अशी बतावणी केली. त्यानंतर पुन्हा ८ मार्च २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात प्रवेश करून २५ लाख न दिल्याचे सांगून शिवीगाळी, दमदाटी करून कर्मचारी शिवानंद टोम्पे यांना धक्काबुक्की केली. तसेच चिंचघर वेताळवाडी येथील शोएब खत्री याने येथील रेखांकनामध्ये १२ गुंठे क्षेत्र वाढवून द्या किंवा ६ लाख ५० हजार रुपये द्या, असे बोलून दमदाटी केली, अशी गंभीर स्वरूपाची तक्रार करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.
पक्ष चालवण्यासाठी २५ लाख रुपये द्या, सरकारी कर्मचाऱ्यांकडे खंडणी मागितल्याने खळबळ
रत्नागिरी : खेड भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांकडे पक्षनिधीच्या नावाखाली तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे. या सगळ्या गंभीर प्रकरणी एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.