Mumbai–Goa Highway:गणेशोत्सवाला चाकरमाणी मोठ्या प्रमाणात गावाला जात आहेत. यामुळेच मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने गणेशभक्तांचा खोळंबा झाला आहे. परिणामी मुंबई गोवा महामार्गावर वाहने कासवगतीने पुढे सरकत आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या जादा गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जादा रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. मात्र, बहुतांश रेल्वे उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस रविवारी तीन-चार तास विलंबाने कोकणात आल्या. तर, जबलपूर-मडगाव गणपती विशेष ट्रेन तब्बल १२ तास उशिराने कुडाळ येथे दाखल झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना सर्वाधिक त्रास झाला.
‘सीएसएमटी’-सावंतवाडी एक्स्प्रेस
कोकण रेल्वेसेवेत नव्याने दाखल झालेल्या ‘सीएसएमटी’-सावंतवाडी एक्स्प्रेस गाडीतील अस्वच्छतेबद्दलही अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. या गाडीतील डब्यांमध्ये बेसिनमध्ये पाणी साचल्याचे दिसत आहे. रेल्वे प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी याची घ्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी गिरीश सावंत यांनी केली.
जिल्ह्यात रविवारीही मोठी वाहतूककोंडी
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनांची वर्दळ कायम राहिल्याने मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात रविवारीही मोठी वाहतूककोंडी झाली. माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला असून, अवघे पाच-सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तास लागत आहे.
वाहतूककोंडी झाल्याचे चित्र
माणगाव आणि इंदापूर येथील अपूर्ण बाह्यवळण मार्ग, बाजारपेठांमधील अरुंद मार्गावरून होणारी वाहतूक, वाहनचालकांकडून होणारे नियमांचेउल्लंघनआणि काही ठिकाणी अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहने कासवगतीने
पळस्पे फाटा परिसरातही वाहनांची संख्या वाढल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. नागोठणे परिसरातील महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने तिथेही वाहतूक कासवगतीने सुरू होती. पेणजवळील जिते गावाजवळ रविवारी पहाटे एका कारला आग लागल्याचे वृत्त आहे. कारमधून धूर बाहेर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान राखून त्याने कार थांबवून प्रवाशांना खाली उतरवले.
पर्यायी मार्गावरही वर्दळ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, पर्यायी मार्गावरही वर्दळ वाढल्याने वाहतूककोंडी होत आहे.
Pune Ring Road: रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांच्या विकासाला नियोजनाचा नकाशा ; डीपी तयार करण्याचे काम सुरू
दोघांचा मृत्यू
चिपळूण : संगमेश्वर आणि खेड येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यात देवरुखजवळील सायले गावात घडली. स्वप्निल श्रीकांत कानाल (२५) असे या तरुणाचे नाव आहे. दुसरीकडे, खेड तालुक्यातील खवटी येथे दुचाकी अपघातात सतीश निवृत्ती पाटे (२९) याचा मृत्यू झाला, तर अक्षता कवडे (२८) जखमी झाली. ते चिपळूणच्या दिशेने निघाले होते.
