• Mon. Sep 14th, 2026

प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपालांकडून स्वागत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2026

मुंबई, दि. १३ : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५० वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे स्वागत केले.

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने हजारो ठिकाणी ‘सूक्ष्म वन’ (Micro Forest) उभारण्याचे उपक्रम हाती घेतले असून, महाराष्ट्रातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्येही अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या शक्यता तपासता येतील, असे प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांबरोबर पर्यावरण संवर्धन, हवामान कृती आणि संबंधित विषयांवर सहकार्य करण्यास आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कला निश्चितच आवडेल, असे प्रिन्स रहीम आगा खान यांनी सांगितले.

तीव्र हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क ही संस्था भारतातील अनेक शहरांमध्ये हवामान कृती आराखड्यावर काम करीत असून, महाराष्ट्रातील शहरे व नगरांमध्ये नाविन्यपूर्ण शीतकरण उपाययोजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे स्थानिक समुदायांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुणे, मीरा-भाईंदर, चंद्रपूर तसेच अन्य ठिकाणी नेटवर्ककडून हवामान कृती, उत्सर्जन कमी करणे आणि शीतकरण उपाययोजनांच्या क्षेत्रात काम सुरू असल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. वसई परिसरातील तलाव व अन्य जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील आपल्या संस्थांच्या माध्यमातून आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क काम करीत असून, या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.  हैदराबाद येथील आगा खान अकादमी तसेच संगीत आणि साहित्य क्षेत्रातील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विविध उपक्रमांची माहिती प्रिन्स रहीम यांनी राज्यपालांना  दिली.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील उपजीविका विकासाच्या क्षेत्रातही आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने काम करण्याबाबत विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण, पर्यावरण, हवामान कृती आणि उपजीविका विकास या क्षेत्रांतील भागीदारीमुळे जनतेला दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण लाभ मिळू शकतील, असे राज्यपालांनी सांगितले.

आई-वडिलांची छायाचित्रे पाहून प्रिन्स भावूक

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी प्रिन्स रहीम आगा खान यांना एक विशेष छायाचित्र अल्बम भेट दिला. या अल्बममध्ये रहीम यांचे दिवंगत वडील करीम आगा खान चौथे व त्यांच्या मातोश्रींचे गेल्या ५० वर्षांतील तत्कालीन राज्यपालांसोबतचे फोटो आहेत. आपल्या दिवंगत वडिलांच्या राजभवनातील आठवणी आणि छायाचित्रे पाहून प्रिन्स रहीम आगा खान भावूक झाले. “हे खरोखरच भावुक करणारे आहे. अप्रतिम!” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed