• Tue. Sep 15th, 2026

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धक्का; मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, मागील उपोषणाचा दाखला, कोणकोणती कारणे दिली?

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई मोर्चाची घोषणा केली असून १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. जरांगे यांनी मागील वर्षी मुंबईत केलेल्या उपोषणाचा संदर्भ देत त्यांच्याकडून विविध अटींचा भंग करण्यात आल्याचे सांगत पोलिसांकडून ही परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांच्या या भूमिकेनंतर आता मनोज जरांगे पाटील यांची पुढील दिशा नेमकी काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारताना मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, “आपल्याकडून विविध नियमांचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल याबाबत माझी खात्री पटलेली आहे. तसंच दक्षिण मुंबई परिसरातील सामान्य व्यवहार, जसे की, शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक आरोग्य इत्यादी बाबी बाधित होऊन सार्वजनिक सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने मी आझाद मैदान येथे १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण व आंदोलन यासाठी आपण मागितलेली परवानगी नाकारत आहे,” असं आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक राजू बिडकर यांनी परवानगी नाकारताना नमूद केलं आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारताना काय-काय म्हटलंय?

– कोणत्याही आंदोलनास, एकाच वेळी फक्त एकच दिवसासाठी परवानगी देण्यात येते. तसंच शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येत नाही. आपण शनिवारी उपोषणासाठी परवानगी मागितली आहे. तसंच मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता आपण यावेळी देखील उपोषणासाठी दिलेल्या एका दिवसाच्या परवानगीचा भंग करणार, याची आम्हाला खात्री पटली आहे.

– आपण आंदोलनाची घोषणा करताना आपल्या गाड्या लाखात असणार आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे आपल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल.

– मागील वर्षी झालेल्या आंदोलनादरम्यान इतर नागरिकांचे हक्क व अधिकार बाधित झाले होते. त्यामुळे यावर्षीही आपण लाखो-करोडो लोकांना मुंबईत येण्यासंदर्भात केलेल्या आवाहनामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होणार आहे याबद्दल आमची खात्री पटली आहे.

– १४ सप्टेंबरपासून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवादरम्यान भाविकांच्या होणाऱ्या अलोट गर्दीमुळे मुंबई ही कायम राष्ट्र‌विघातक शक्तींच्या निशाण्यावर राहिलेली आहे. त्यादृष्टीने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सदरील आंदोलनादरम्यान होणाऱ्या अलोट गर्दीमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनामध्ये बाधा निर्माण होणार आहे.

जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची घोषणा, कसा असेल मुंबईपर्यंतचा प्रवास?

अंतरवाली सराटी येथे आयोजित मराठा आरक्षण आंदोलकांच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची दिशा जाहीर केली. ‘सरकारला आणखी काही दिवस संधी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री‌ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत यावे अथवा आम्ही मुंबईला निघाल्यानंतर आझाद मैदानापर्यंत कुठेही रस्त्यात यावे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली आहे असे समाजाला सांगावे,’ असे सांगून जरांगे यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासाचे वेळापत्रक जाहीर केले. १५ सप्टेंबर रोजी पाटोदा (जि. बीड) येथे पहिला मुक्काम, १६ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे दुसरा मुक्काम, १७ सप्टेंबर रोजी हडपसर (जि. पुणे) येथे तिसरा मुक्काम, १८ सप्टेंबर रोजी खोपोली (जि. रायगड) येथे चौथा मुक्काम आणि १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात, अशी कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed