• Tue. Sep 15th, 2026

vehicle parking: मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार उद्याने, मैदानांखाली सुविधा निर्माण करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. त्यानुसार ३२ जागांची पाहणी केली. त्यातून दोन जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,मुंबई :मुंबईतील वाढती वाहनसंख्या व पार्किंगची गरज पाहता मुंबई महापालिकेने आता मोकळी मैदाने आणि उद्यानांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेने सर्वांत वर्दळीच्या भागातील ३२ ठिकाणी भूमिगत पार्किंग करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. ही सर्व मोकळी मैदाने आणि उद्याने असून यापैकी दोन ठिकाणांवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. या सर्व ३२ ठिकाणी महत्त्वाच्या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईतील वाहनसंख्या दुपटीने वाढली

मुंबईत गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या मुंबईत वाहनांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबईतील वाहनसंख्या दुपटीने वाढली. परिणामी प्रदूषणबरोबरच वाहतूक कोंडी, पार्किंगसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पर्याय नाहीच

त्यामुळे मुंबई महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष केंद्रीत केले आहे. बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक पार्किंग उभारले जात आहे. यामध्ये भूमिगत पार्किंगही आहे. कुलाबा, फोर्ट परिसरात खासगी, सरकारी कार्यालयांची संख्या मोठी आहे, तसेच अनेक पर्यटकही वाहने घेऊन येतात. काहींना रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो.

बहुतांश पार्किंगच्या जागा या पूर्व आणि पश्चिम उपनगरात

पार्किंगची मागणी पाहता हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेने मोकळी मैदाने, उद्यानांखालीही भूमिगत पार्किंग होऊ शकते का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून ३२ मोकळी मैदाने आणि उद्यानांच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. यातील बहुतांश पार्किंगच्या जागा या पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहेत.

भूमिगत पार्किंगची गरज

३२पैकी दोन जागांवर जवळपास शिक्कामोर्तब होत असून याबाबत मात्र मुंबई महापालिकेने कमालीची गुप्तता पाळली आहे. मोकळी मैदाने आणि उद्यानांच्या खाली होणारे पार्किंग बहुस्तरीय पार्किंग असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईसाठी पूरनियंत्रण आराखडा आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये अधिवेशनात माहिती देताना भूमिगत पार्किंगची गरज अधोरेखित केली होती.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईत AC ‘एसी’ तिकिटाअभावी विद्यार्थिनीची फरपट, पालकांची गंभीर तक्रार; अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत मुंबईत काय घडलं?

मुंबईतील विविध मुद्द्यावर चर्चा

त्यानंतर आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईतील प्रत्येक महापालिका वॉर्डमध्ये भूमिगत पार्किंग उभारले जाणार असल्याचेही स्पष्ट करताना २७ ठिकाणी पार्किंग उभारले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दादर वसंत स्मृती येथील भाजपच्या कार्यकारणी बैठकीतही पक्षाच्या बैठकीत मुंबईतील विविध मुद्द्यावर चर्चा करताना या भूमिगत पार्किंगचा उल्लेख केला होता.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा