• Fri. Sep 11th, 2026

Diva Railway Station : दिवा रेल्वे स्थानकात प्रवासी सुरक्षा धोक्यात, जखमी प्रवाशाचा व्हिडीओ शेअर करत राजू पाटील यांच्याकडून संताप व्यक्त

दिवा रेल्वे स्थानकाजवळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गर्दीमुळे एक प्रवासी हा लोकलमधून खाली पडतो. त्याला दिवा रेल्वे स्थावनकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकातून स्ट्रेचरने नेले जात होते. या घटनेवरुन आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
विनित जांगळे, ठाणे : दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून गंभीर जखमी होणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची परिस्थिती आणि स्थानकातील अपुऱ्या सेवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या चित्रफीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे.

“दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून एक प्रवासी गंभीर जखमी झाला. त्याला दिवा रेल्वे स्थानक फाटकात रुग्णवाहिका मिळण्याआधी कचरा वाहणाऱ्या घंटागाडीच्या बाजूने स्ट्रेचरवर नेले जात होते. त्याला योग्य आरोग्य सुविधा न पुरवता फाटकात रेल्वे रुळाशेजारी ठेवल्याचे या चित्रफितीतून स्पष्ट झाले. रोज लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशांच्या नशिबी हीच वागणूक आहे का?”, असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे.

“आपण बुलेट ट्रेन व हायटेक स्थानकाच्या गप्पा मारतो. मात्र एका जखमी प्रवाशाला साधी सन्मानजनक वैद्यकीय मदत देऊ शकत नाही. हे प्रशासन कधी जागे होणार, सामान्य माणसाच्या जिवाची किंमत प्रशासनाच्या नजरेत फक्त ‘कचरा’ झाली आहे का?”, असा प्रश्न पाटील यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

डोंबिवली, दिवा आणि ठाणे मार्गावरील लोकल प्रवाशांची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे दररोज प्रवाशांना जीवाची बाजी लावून प्रवास करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण – डोंबिवली पट्ट्यात गर्दीमुळे लोकलधून पडून होणाऱ्या अपघातांचे आणि मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. गर्दीच्या वेळेत एका चौरस मीटरच्या जागेत 14 ते 16 प्रवासी कोंबले जातात. त्यामुळे गुदमरल्यासारखे होते. लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी जीवघेणी धडपड आणि प्लॅटफॉर्मवर होणारी प्रचंड गर्दी यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

Maharashtra TimesEknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?प्रशासनाने दिवा आणि डोंबिवली स्थानकांसाठी गर्दीच्या वेळेत विशेष आणि अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अन्यथा डोंबिवली आणि दिवा स्थानकांवर प्रवाशांचा तीव्र उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला सर्वस्वी रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.

महिला किरकोळ जखमी

डोंबिवलीहुन निघालेल्या लोकलमधून एक महिला रुळावर कोसळल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून गर्दीच्या रेट्याने ही महिला रुळावर कोसळली.