• Fri. Sep 11th, 2026

Thane News : प्रताप सरनाईक यांचा पक्षातील नेत्यालाच घरचा आहेर, ठाण्यातील रखडलेल्या ‘झोपू’ प्रकल्पांवरुन साधला निशाणा

ठाण्यातील रखडलेल्या ‘झोपू’ प्रकल्पांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षातील नेत्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच विकासकांच्या आडमुठेपणामुळे रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावा, सक्षम विकासकांकडे प्रकल्प द्या, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांमधील विकासकांवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. सरनाईक यांच्या ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या तब्बल 11 प्रकल्पांचा सविस्तर आढावा खेवरा सर्कल येथील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात त्यांनी घेतला. यावेळी संबंधित प्रकल्प रखडवणाऱ्या विविध विकासकांकडून काढून सक्षम विकासकांकडे देण्याची स्पष्ट भूमिका सरनाईक यांनी मांडली.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प मागील 18 ते 20 वर्षांपासून रखडलेले असून, विकासकांकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे झोपडपट्टीवासीयांना अद्याप त्यांच्या हक्काच्या घरांचा लाभ मिळालेला नाही. तर अनेक प्रकल्पातील रहिवाशांना वेळेवर भाडे मिळत नसल्याने सर्वसामान्य हवालदिल आहेत. त्यामुळे विकासकांची मनमानी आणि आडमुठी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी बैठकीत मांडली.

Maharashtra TimesMumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद“ज्या विकासकांना प्रकल्प पूर्ण करण्यात स्वारस्य नाही किंवा जे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडवत आहेत, अशा विकासकांकडून प्रकल्प काढून घेऊन ते सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विकासकांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी,” असे निर्देश सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सरनाईकांचा शिवसेना पक्षातील नेत्यांना घरचा आहेर

शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या संजय पांडे यांच्या सुभाषनगर आणि गांधीनगर येथील प्रकल्पांवरूनचा सरनाईक यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. विकासकाच्या आर्थिक फायद्यासाठी प्रकल्प मंजूर केले जातात. यामध्ये संजय पांडे असेल अथवा इतर कोणीही त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा पवित्रा सरनाईक यांनी घेतला. तसेच पक्षाच्या आडून कोणीही व्यावसायिक हित साधत असेल, तर ते चुकीचे असून सर्वसामान्य गोरगरिबांच्या हित महत्वाचे असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.

Maharashtra TimesEknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?

Pratap Sarnaik

‘क्लस्टर’ प्रकल्प राबवण्याची भूमिका

गांधीनगर, हरदास नगर, चिरागनगर, लक्ष्मी – चिरागनगर, माजिवडा, शास्त्रीनगर अशा प्रकल्पांचा सरनाईक यांनी आढावा घेतला. यातील काही प्रकल्प शिवसेना नेत्यांचे असले तरीही त्यात हयगय करणे चुकीचे असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकारचा एकच भाग आहोत. गोरगरिबांना घर मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामध्ये काही दलाली मंडळीनी प्रकल्पच विकले असून ते चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खात्याअंतर्गत क्लस्टर प्रकल्प राबवण्याची भूमिका सरनाईक यांनी स्पष्ट केली. तसेच सुभाष नगरमध्ये गेल्या 20 वर्षांपासून नागरिकांना घर मिळाले नसल्याची बाब त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली.