• Fri. Sep 11th, 2026

‘दिलखुलास’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची मुलाखत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात “पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा” या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शनिवार, १२ आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. उत्सवाचा आनंद आणि आस्था कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिकचा वापर टाळणे, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि योग्य व्यवस्थापन, तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे, या बाबी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वाच्या आहेत. उत्साह आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जलस्रोतांचे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

तसेच गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम तसेच पारंपरिक वाद्यांवर आधारित मिरवणुकांना प्रोत्साहन याबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनासोबत नागरिक, युवक आणि गणेशोत्सव मंडळांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही डॉ. जॅसमिन यांनी सांगितले आहे. या मुलाखतीचे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *