• Fri. Sep 11th, 2026

Kalyan-Shilphata Road: मेट्रो-१२ सोबतच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कल्याण शिळफाटा मार्गावर गेली दोन वर्षे वाहतूक कोंडी होत आहे.खांबाच्या खोदकामामुळे पुन्हा एकदा निम्म्याहून अधिक रस्ता बंद करण्यात आला आहे.यामुळे वाहनचालक चांगलेच हैराण झाले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,कल्याण : कल्याण-तळोजा मेट्रो-१२ मार्गिकेचे काम सुरू असून, मागील दोन वर्षांपासून कल्याण-शिळ मार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कल्याण फाटा ते रांजणोली दरम्यान उड्डाणपुलाचे खांब उभारण्याचे काम सुरू केल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे.

वाहतूक झाली केली , वाहतूक कोंडी वाढली

मंगळवारी रात्री सोनारपाड्याजवळ मेट्रोच्या खांबावरील लोखंडी प्लेट घसरल्याने मानपाडा रोडपासून टाटा पॉवरपर्यंत कल्याण दिशेकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि वाहनचालकांचे हाल झाले. आधीच कोंडीचा सामना करणाऱ्या या मार्गावर एखादी दुर्घटना घडली, तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

वाहनचालक त्रस्त

तळोजा ते कल्याण या प्रस्तावित मेट्रो-१२ मार्गाचे काम सुरू झाल्यापासून मागील तीन ते चार वर्षांपासून कल्याण-शिळ मार्ग वाहतूक कोंडीने ग्रासला आहे. मेट्रोचे खांब उभारून गर्डर टाकल्यानंतर रस्ता मोकळा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा या खांबांच्या लगत नव्या खांबांचे काम सुरू करण्यात आले आहे. या खांबांच्या खोदकामासाठी पुन्हा एकदा निम्म्याहून अधिक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडीत भर पडली आहे. ही कोंडी फुटणार तरी केव्हा, असा प्रश्न त्रस्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.

सर्व्हिस रोडवरून वाहतुक वळवण्यात आली

सोनारपाड्याजवळ मेट्रोच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना अचानक लोखंडी प्लेट घसरल्याने घबराट पसरली. तातडीने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आली आणि घसरलेली प्लेट पुन्हा खांबावर चढविण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागला. रात्रीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक तुलनेने कमी असल्यानेसर्व्हिस रोडवरून वाहतूक वळविण्यात आली होती.

शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

कल्याण-शिळ मार्गिकेखाली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलामुळे कल्याण फाट्यावरून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना शहरात प्रवेश न करता थेट जाता येणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होणे शक्य होणार आहे.

Maharashtra TimesCyber Crime: बनावट आयडी आणि खोटा बारकोड, ‘स्वस्त आयफोन’च्या नावाखाली नागरिकांची लाखोंची फसवणूक, सायबर टोळीतील पाच जणांना अटक

खांबालगतच्या कामामुळे हाल

या उड्डाणपुलाचे कामही एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या खांबांलगतच उड्डाणपुलाच्या खांबांचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांना दुहेरी कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मेट्रोच्या खांबांलगत नव्याने खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे काम उड्डाणपुलासाठी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा