• Thu. Sep 10th, 2026

शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

शालेय क्रीडा प्रकारातील ४४ खेळांना क्रीडा गुणांची सवलत देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, खेळांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याबरोबरच सुदृढ आणि निरोगी राष्ट्रनिर्मितीस हातभार लागतो. राज्यातील विविध शाळा शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय अनेक क्रीडा प्रकार आणि स्पर्धांचे आयोजन करतात. या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनामध्ये क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत संबंधित विभागांनी सकारात्मक कार्यवाही करावी.

महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या मागणीनुसार, विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील चार लाखांहून अधिक विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रीडा सवलतीचे गुण देण्याची मागणी संस्थेने केली आहे.

बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रुपाली सावंत, क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी कुणाल सरपाते, शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी दारासिंग दुल्हत, महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, विविध विनाअनुदानित शालेय खेळांचे प्रशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

0000

योगेश मोरे/उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed