• Thu. Sep 10th, 2026

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. या अभियानाच्या माध्यमातून योजनेचा लाभार्थी संवाद, योजना प्रसिद्धी, वनहक्क, महिला बचत गट, आरोग्य तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांतील मूलभूत सुविधां, आरोग्य सेवा, यासर्व सेवा सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संकल्प अभियान संदर्भात बैठक झाली.  महोदयांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे विभागाचे अपर आयुक्त, आयुक्त गोपीचंद कदम तसेच सर्व प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा

१७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत अभियानाचे नियोजन करून प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील उपक्रमांचे वेळापत्रक सादर करावे. योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे अनुभव व प्रतिक्रिया घेऊन जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी. लोकप्रतिनिधींच्या सहभागातून गावपातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करून योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा.

राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे महिला बचत गटांचा विशेष कार्यक्रम आयोजित  करून त्यांच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात यावा..यासाठी बचत गटांची संख्या, त्यांना देण्यात आलेले अर्थसहाय्य, निवडलेले व्यवसाय व झालेली प्रगती याची माहिती प्रकल्पनिहाय तयार ठेवून योग्य प्रचार-प्रसिद्धी करण्यावर भर द्यावा. वनहक्क लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान करावी. तसेच जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवून कागदपत्रांची पूर्तता करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

आश्रमशाळा व वसतिगृहांतील पाणीपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवून आवश्यक पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा अद्ययावत डेटा ठेवावा. ॲनिमियाबाबत जनजागृती व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आरोग्य शिबिराला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करुन प्रसिद्धीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

विभागाच्या योजनांची माहिती पॅम्पलेट, माहितीपत्रके व प्रचाररथाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवावी. विभागाच्या कामाची अद्ययावत माहिती उपलब्ध ठेवून शासनस्तरावर आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याची तयारी ठेवावी. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मंत्री डॉ अशोक वुईके दिले.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed