• Fri. Sep 11th, 2026

Manoj Jarange: अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? जरांगे पाटलांची विमान अपघाताच्या तपासावर शंका

योगेश काकफळे, जालना: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आज दहाव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले. याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबतही शंका व्यक्त करत या घटनेच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करताना जरांगे पाटील भावुक झाले. “अजितदादांचं कोणासोबत शत्रुत्व नव्हतं. एवढा मोठा माणूस असा मरत असतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे आणि अभ्यासू नेतृत्व होते. त्यांनी राज्यासाठी आणि देशासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे अशा नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपास यंत्रणांकडून विविध पातळ्यांवर तपास करण्यात येत आहे. विमानाच्या तांत्रिक स्थितीपासून ते उड्डाणाच्या परिस्थितीपर्यंत विविध बाबी तपासाचा भाग आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती, फ्लाइट डेटा आणि कॉकपिटमधील संभाषण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मात्र, अजितदादांच्या मृत्यूबाबतची संपूर्ण आणि अंतिम माहिती जनतेसमोर स्पष्टपणे यायला हवी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करण्यापेक्षा या घटनेचा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा

पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून केवळ आश्वासने, बैठका आणि चर्चांच्या माध्यमातून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाज आता सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही; निर्णय हवा आणि त्याची अंमलबजावणी हवी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

यापुढे मराठा समाज गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी मुंबई गाठण्याचा इशारा दिला. सरकारने आंदोलनाची ताकद कमी लेखू नये. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आपली मागणी मांडत आहे, मात्र मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले तर आंदोलनाची दिशा आणि व्याप्ती आणखी मोठी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण दहाव्या दिवसात पोहोचले आहे, तर दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता सरकार आणि तपास यंत्रणा या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.