गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या फेऱ्यांची वेळ दीड तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव यांसह दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. दिवसभर नोकरी-व्यवसाय करून संध्याकाळी दर्शनासाठी बाहेर पडणारे नोकरदार, कुटुंबासह येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी आणि वाहतूककोंडी असते. अशा वेळी मेट्रोचा पर्याय उपलब्ध राहिल्याने खासगी वाहन किंवा टॅक्सीच्या शोधासाठी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. नुकतीच रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ लागू झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रो-३ हा पर्याय ठरू शकतो.
कसे असतील बदल?
कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री १२ वाजता सुटणार
१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रो-३च्या शेवटच्या फेऱ्यांना मुदतवाढ
रात्री उशिरापर्यंत दर्शन घेणाऱ्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी पर्याय उपलब्ध
गणेशोत्सवातील गर्दी आणि वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
रिक्षा-टॅक्सीच्या वाढलेल्या भाड्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचा पर्याय
गणरायाच्या स्वागताची लगबग!
पावसाच्या हलक्या सरींच्या साथीने मुंबईकरांच्या उत्साहाला सध्या उधाण आले आहे. गणेशोत्सवाला अवघे आठ दिवस उरले असताना रविवारी लालबाग परिसरात गणरायाच्या मूर्तींची लगबग पाहायला मिळते आहे. विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील मूर्तींनी परिसर फुलून गेला असून, मूर्ती पाहण्यासाठी आणि निवडण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे उत्सवाला अजून आठवडा बाकी असला, तरी मुंबईत मात्र आतापासूनच गणेशोत्सवाचा माहोल रंगू लागला आहे.
रविवारची सुट्टी साधत अनेकांनी गणरायाच्या मूर्तीची निवड, घरातील सजावटीची खरेदी आणि पूजेच्या साहित्याची जमवाजमव सुरू केली आहे. पावसाची पर्वा न करता नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले असून विविध साहित्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. विविध मंडळांच्या मंडपात जाणाऱ्या मूर्तींच्या रांगा, त्याभोवती सुरू असलेली तयारी आणि गणरायाच्या दर्शनासाठी थांबलेले नागरिक यामुळे लालबाग परिसराला उत्सवी स्वरूप आले होते.
गावी जाणाऱ्यांचीही तयारी..
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या मुंबईकरांकडून घरातील तयारीबरोबरच प्रवासाचे नियोजन, कपडे आणि गणरायासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जात आहे. अनेक कुटुंबांनी गावी जाण्याच्या तारखा निश्चित केल्या असून, त्यानुसार घरातील कामांची आखणी सुरू आहे.
“गणेशोत्सवासाठी दरवर्षी आपण कोकणात गावी जातो. यंदाही सगळ्यांनी मिळून आधीच तयारी सुरू केली आहे. खरेदीसोबतच प्रवासाचे नियोजन करावे लागते. मुलांच्या परीक्षा असल्याने यंदा त्यांचे वेळापत्रकही लक्षात घ्यावे लागणार आहे,” असे अमोल पाटील यांनी सांगितले.
“गावी गणपती असतो, त्यामुळे मुंबईत कितीही काम असले तरी सणासाठी तिकडे जाण्याची ओढ असते. यंदा परीक्षांमुळे थोडी धावपळ आहे; पण गणेशोत्सवाची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे,” असे नेहा सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, गणरायाच्या आगमन सोहळ्यांची तरुणाईमध्ये विशेष उत्सुकता आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि मोठ्या उत्साहात होणारे गणरायाचे आगमन अनुभवण्यासाठी तरुणाईने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. मित्रांचे गट तयार करून विविध मंडळांच्या आगमन सोहळ्यांना उपस्थित राहण्याचे बेत आखले जात आहेत.
“गणेशोत्सवात आगमन सोहळ्यांची वेगळीच मजा असते. मित्रांसोबत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन पाहणे हा आमच्यासाठी उत्सवाचाच एक भाग आहे. यंदा काही प्रमुख आगमन सोहळे नक्कीच पाहणार,” असे रोहित कदम या तरुणाने सांगितले.
“परीक्षा असल्या तरी अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळून आगमन सोहळ्याला जाणार आहोत. वर्षातून एकदाच येणारा हा उत्सव असल्याने मित्रांसोबतचा उत्साह चुकवायचा नाही,” असे स्नेहा मोरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सांगितले.