• Sun. Sep 6th, 2026

Pune Vidyanand Bapat: मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, लोकांनी डीजेवर नाचवलं, मीम्सचाही धुमाकूळ; विद्यानंद बापट खास शैलीत बोलले, नेमकं काय म्हणाले?

पुणे: डीजेमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. डीजेला ठाम विरोध अन् प्रमाण मराठीचा वापर यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर मीम्सचाही महापूर आला आहे. तसंच काही अतिउत्साही तरुणांनी तर थेट एआयचा वापर करत बापट यांना डीजेवर नाचताना दाखवलं आहे. तर दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या भाषा कौशल्याचं कौतुक केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बापट यांनी ‘मटा ऑनलाइन’ला आपली प्रतिक्रिया दिली असून माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा साध्य महत्त्वाचं असून मी जो मुद्दा मांडत आहे तो तडीस जायला हवा, अशी भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर बोलताना विद्यानंद बापट यांनी म्हटलंय की, ” भाषा हे साधन आहे, ते साध्य नाही. आपला मुद्दा मांडण्याचं आणि दुसऱ्यासोबत संवाद साधण्याचं ते एक माध्यम आहे. भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल आणि त्याचा वापर तुम्ही योग्य करण्यासाठी करत असाल तरच त्याला काही अर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले दुसऱ्याला त्रास न होता तुमचा मुद्दा मांडायला हवा. म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावू नयेत. पण भावना दुखतात म्हणजे यांना नेमकं काय होतं? नेमकं कुठं दुखतं? डीजेमुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचं डोकं दुखतं, ह्रदयाला त्रास होतो. तसं यांच्या भावना दुखल्यावर नेमकं काय होतं,” असा खोचक टोला बापट यांनी लगावला आहे.

मीम्सवर काय म्हणाले बापट?

सोशल मीडिया मीम्स आणि नाचतानाचे एआय व्हिडिओ यााबाबतही विद्यानंद बापट यांनी भाष्य केलं आहे. “मी नसताना काही व्हिडिओ बनत असतील तर आज एआयचा जमाना आहे. त्यामुळे ते काहीही बनवू शकतात. त्यावर मी कशाला प्रतिक्रिया देऊ? मी मुद्द्यावर फोकस करेन. मी सोशल मीडिया वापरत नाही फक्त व्हाट्सअॅप वापरतो. काही मेम्स वगैरे माझ्याकडे येतात. त्यामुळे ते मी बघतो, पण सगळं पाहणं माझ्याकडून होत नाही. अवधूत गुप्ते यांनी माझ्यावर बनवलेलं गाणं मी पाहिलं. पण पूर्ण पाहणं झालं नाही. काही अंशी ते पाहिलं आहे. गुप्ते हे कलाकार आहेत. त्यांचं काम ते करतील. कारण चित्रकार असतात ते चित्र काढतील. आणखी कोणी कलाकार असतील तर ते त्यांचं काम करतील. मला मुद्द्यावर फोकस करायचा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

रुपाली ठोंबरेंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला विरोध करत ते रत्नागिरीवरून आल्याचं सांगितलं. या टीकेचाही बापट यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. “रत्नागिरीवरून येऊन आम्हाला गणेशोत्सव शिकवू नका, असं म्हणणंच मुळात बेसलेस आहे. हा गणेशोत्सव ज्या लोकमान्य टिळकांनी सुरू केला ते सुद्धा रत्नागिरीहूनच आले होते. त्यामुळे माझ्यावर होणारा हा आरोप तार्किकदृष्ट्या टिकणारा नाही. तुम्हाला मुद्द्यावर बोलता येत नाही, त्यामुळे तुम्ही असा आरोप करता,” असा पलटवार बापटांनी केला आहे.

दरम्यान, “माझं म्हणणं वारी बंद करायचं असं अजिबात नाही. रवींद्र धंगेकर हे जाणीवपूर्वक असं बोलत आहेत. सण उत्सव साजरे करताना त्यात कालसुसंगत बदल व्हावेत, हे बदल असे व्हावेत की ज्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, इतकंच आमचं म्हणणं आहे. कुठलेही धार्मिक उत्सव बंद करावे, असं मी कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळे ते जाणीवपूर्वक विपर्यास करत आहेत,” असा आरोपही विद्यानंद बापट यांनी केला आहे.