नाशिकमध्ये धरणे आंदोलन कायम ठेवत पुढील आठवड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे आणि संबंधित मंत्री-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या उलगुलान आंदोलनात‘ सीजेपी’चे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह राज्यभरातील आदिवासी आंदोलक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारसमोर उलगुलान आंदोलनाचे नवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
Nashik News: कृषिसेवा केंद्रांना दणका, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 केंद्रांचे परवाने निलंबितराज्यातील आदिवासी वसतिगृहांमधील असुविधा, सेंट्रल किचन रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट, तसेच गेल्या दोन वर्षांत वसतिगृहांतील ५९३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करीत आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या सर्व परिस्थितीसाठी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड जबाबदार असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
डॉ. उईके यांचा राजीनामा घेण्यात यावा, तसेच सचिव वाघमारे आणि आयुक्त बनसोड यांना तातडीने हटवावे, या मागणीसाठी राहुल पावरा, लक्ष्मी जाधव आणि विवेक गावित यांनी दोन आठवड्यांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलनही सुरू होते. हे आंदोलन मागे घेण्यासाठी आदिवासी आयुक्तालयाकडून प्रयत्न झाले; मात्र ते निष्फळ ठरले. उलट आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत गेला.
शासनाकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी १ सप्टेंबर रोजी आदिवासी आयुक्तालयावर उलगुलान महामोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि मागण्यांवर ठाम असल्याचे दाखवून दिले.
Ashram School: आश्रमशाळांमधील दोन विद्यार्थिनींचा करुण अंत; नाशिक जिल्ह्यातील घटना, 3 अधिकाऱ्यांचे निलंबनत्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजित दीपके, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यस्थी केल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. मात्र, नाशिकमधील आंदोलन कायम ठेवत मुंबईत उलगुलान महामोर्चा काढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
महाविकास आघाडीचे बळ
नाशिकमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे, सीजेपीचे अभिजित दीपके यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईत होणारा उलगुलान महामोर्चा राज्यव्यापी स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. या मोर्चात अभिजित दीपके, आदित्य ठाकरे यांच्यासह राहुल गांधीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
