• Sun. Sep 6th, 2026

Yamini Yadav Murder : घरी जेवण बनवण्याऐवजी डान्स क्लासला जाण्याचा हट्ट करणाऱ्या बायकोशी नवऱ्याचा वाद झाला आणि त्याने तिचा शेवट केला

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : आपल्या सोसायटीतील डान्स क्लासला जाण्याची महिलेची इच्छा होती. मात्र या कारणावरुन पतीसोबत झालेल्या वादाचे रुपांतर एका दुर्दैवी घटनेत घडले आणि महिलेला प्राण गमवावे लागले. घरी जेवण बनवण्याऐवजी डान्स क्लासला जाण्याच्या निर्णयावरुन झालेल्या वादावादीतून पतीने मारहाण केली. यात जखमी झालेल्या नागपुरातील ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव यामिनी कृष्ण लाल यादव असे असून ४१ वर्षीय आरोपीचे नाव कृष्ण लाल यादव असे आहे. या जोडप्याला दोन लहान मुले आहेत.

जेवण न बनवता डान्स क्लासला जाण्याचा हट्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरुन घरी परतला आणि त्याने यामिनीला स्वतःसाठी व मुलांसाठी जेवण बनवण्यास सांगितले. मात्र यामिनी त्यांच्या सोसायटीत असलेल्या डान्स क्लासला जाण्याची तयारी करत होती. त्यामुळे तिने स्वयंपाक करण्यास नकार दिला.

या जोडप्यामधील मतभेदाचे रुपांतर हिंसक वादात झाले. पोलिसांनी सांगितले की, त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कृष्ण लालने आपल्या दोन मुलांसमोरच यामिनीच्या मानेवर आणि पोटावर मारहाण केली.

मान-पोटावर लाथा

मारहाणीनंतर यामिनीला मान आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिने पतीला पेनकिलर आणण्यास सांगितले. कृष्ण लाल औषधाच्या दुकानात गेला, पण दुकान बंद असल्याने तो औषध न आणताच घरी परतला.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

यामिनीची प्रकृती खालावत गेली आणि गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे तिच्या पोटावर सूज आली. नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली. मात्र शवविच्छेदन अहवालातून गंभीर दुखापती उघड झाल्या. मानेचे हाड मोडल्याचे आणि आतड्यांचे गंभीर नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले.

पोस्टमार्टम रिपोर्टमधील निष्कर्षांनंतर पोलिसांनी कृष्ण लालची चौकशी केली आणि नंतर त्याला अटक केली. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपुरातील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.