• Thu. Jul 30th, 2026

    महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

    महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

    Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट परिसर येथील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे महामुंबईमध्येही शुक्रवारी पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकण, घाट परिसरामध्ये गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

    कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

    प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईमध्ये शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल, असा अंदाज वर्तवला आहे. पालघरला शुक्रवारसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला. रायगडमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवसांसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ असून गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह उपस्थिती लावू शकेल, तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पावसाचा जोरही गुरुवारपासून वाढू शकतो. या दोन्ही जिल्ह्यांना ‘यलो ॲलर्ट’ आहे.

    Maharashtra TimesGadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला

    पावसाने मोडला ११७ वर्षांचा विक्रम

    पुण्यात यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने सन १९०७ च्या जुलैमध्ये झालेल्या ५०८.५ मिलिमीटर पावसाचा विक्रम मोडला आहे. शहरात एक ते २९ जुलै दरम्यान ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही विक्रमी पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. घाट माथ्यावर जोरदार; तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

    पुणे शहरात एक जून ते २९ जुलै या कालावधीत ५७२.९ मिमी पावसाची नोंद झाली.पुण्यात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली, दिवसभर आकाश ढगाळ होते, उकाडाही वाढला होता, केवळ दुपारी काही भागांत हलक्या सरी पडल्या. रात्री हवेत गारवा जाणवला. दोन दिवसांच्या तुलनेत शहरात तापमानात वाढ नोंदविण्यात आली. बुधवारी दिवसभरात २८.२ कमाल आणि २२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्हा आणि घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

    पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं असेल?

    पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती संमिश्र राहील. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट माथ्याच्या परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या जिल्ह्यांचे मैदानी भाग तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील; सांगली व सोलापूरसाठी कोणताही इशारा नाही.

    उत्तर महाराष्ट्रात मुसळधार सरींचा इशारा

    उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा आणि नाशिकच्या घाट परिसरात प्रादेशिक हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या भागांमद्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

    मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कसं असेल?

    ३० जुलै रोजी मराठवाड्याती बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत धो-धो पाऊस बरसेल. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा