• Thu. Sep 17th, 2026

Ganesh Arrival 2026:अखेर गणपची बाप्पांच्या आगमनाचा दिवस आलाच. गणपती बाप्पा मोरया म्हणत संपूर्ण जिल्हा भक्तिमय झालेला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
टीम मटा ,ठाणे :ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘गणपतीबाप्पा मोरया’च्या जयघोषाने ठाणे जिल्ह्यातील वातावरण भक्तिमय झाले असून, आज जिल्ह्यात १ लाख ६६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. सार्वजनिक मंडळे ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि जल्लोषात गणरायाला मंडपात आणत आहेत.

गणेशोत्सवाच्या जल्लोषाला सुरूवात

घराघरांतही बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू आहे. सजलेले मंडप, फुलांनी नटलेली घरे, पूजेच्या साहित्याने गजबजलेल्या बाजारपेठा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहाने धावणारे भाविक… या साऱ्यांनी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रविवारी रात्रीपासून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे.

बाप्पाच्या स्वागताचा उत्साह कायम

आज जिल्ह्यातील घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसर गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारून गेला आहे. पारंपरिक वेशभूषेत कुटुंबासह गणपती कारखान्यांकडे जाणारे भाविक, टाळ-मृदंगाच्या गजरात मूर्ती घेऊन परतणारे भक्त आणि मखर, फुले-पत्री, पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी, असे उत्सवी चित्र सर्वत्र दिसत आहे. या गर्दीमुळे काही भागांत वाहतूक कोंडी होत असली, तरी बाप्पाच्या स्वागताचा उत्साह मात्र कायम आहे.

१ लाख ६६ हजार ५२४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा तब्बल १ लाख ६६ हजार ५२४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये १ हजार ७६ सार्वजनिक, तर १ लाख ६५ हजार ४४८ खासगी गणपतींचा समावेश आहे. सर्वाधिक गणेशमूर्तीकल्याण परिमंडळात असून, त्यानंतर उल्हासनगर, वागळे इस्टेट, भिवंडी आणि ठाणे परिमंडळाचा क्रमांक आहे.

ठाणे पोलिस हद्दीत १९३ विसर्जनस्थळे

गणरायाच्या आगमनाबरोबरच विसर्जनाचीही तयारी सुरू झाली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १९३ विसर्जनस्थळे असून, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १३३ कृत्रिम तलाव उभारण्याचे काम सुरू आहे. दुर्गाडी गणेश घाटआणि डोंबिवलीतील मोठागाव गणेश घाटावर मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन होत असल्याने तेथेही नियोजन करण्यात येत आहे.

महापालिका आणि पोलिस यंत्रणा सज्ज

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तीन हजार ३००हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, एक हजार होमगार्ड जवानांची मदत घेतली जाणार आहे. एसआरपीएफच्या कंपन्याही बंदोबस्तासाठी असणार आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra TimesFDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचना

पावसामु‌ळे तारांबळ

शनिवारी मध्यरात्रीपासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठाणे परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आणि गणेशभक्तांची काहीशी तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या सरी आणि साचलेल्या पाण्याची पर्वा न करता बाप्पाच्या आगमनाचा उत्साह कायम होता.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा