Mumbai Local: गणेशोत्सवाचे दिवस हे शनिवार रविवार आल्याने. नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु रविवारी रेल्वेचे ब्लॉक असल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली .
प्रवाशांचे हाल
यामुळे दादर, घाटकोपर, ठाणे या स्थानकांत गर्दी उसळली. हातात खरेदीच्या बॅगा घेऊन गर्दीतून वाट काढत लोकलमध्ये शिरताना प्रवाशांचे हाल झाले. प्रथम श्रेणी आणि एसी लोकलमध्येही तिकीटधारकांसह विनातिकीट प्रवाशांची भर पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
लोकल फेऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी होते
मध्य रेल्वेवर सोमवार ते शनिवारच्या तुलनेत रविवारी सुमारे ३००हून अधिक लोकल फेऱ्या रद्द असतात. त्यामुळे धावत असलेल्या लोकल फेऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. सोमवारी गणेश चतुर्थी आहे. नोकरदारांना कामामुळे अन्य दिवशी खरेदी करणे शक्य नसल्याने बहुतांशी नागरिक रविवारीखरेदीसाठी बाहेर पडले. दादर, मशीद बंदर, क्रॉफर्ड मार्केट गर्दीने फुलून गेले. परतीच्या प्रवासात मात्र प्रवाशांचे हाल झाले.
लोकलच रद्द
‘आमच्याकडे गौरी-गणपतीचे आगमन होते. विद्युत रोषणाई आणि मखर घेण्यासाठी आम्ही क्रॉफर्ड मार्केट, मशीद बंदर येथे पोहोचलो. खरेदी करून घरी जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकावर पोहोचल्यावर अनेक लोकल रद्द असल्याचे इंडिकेटरवरून दिसून आले. परतीच्या प्रवासासाठी एसी लोकलचे तिकीट घेतले मात्र एसी लोकलच रद्द झाल्याने आमच्या पैशांचे काय’, असा प्रश्न प्रवासी निरंजन देशमुख यांनी उपस्थित केला.
प्रशासनाने विचार करणे गरजेचे
गणेश चतुर्थीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने रविवारचा पूर्वनियोजित ब्लॉक रद्द केला. मात्र मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते कल्याणसह ट्रान्सहार्बर मार्गावर ही ब्लॉक कायम ठेवला. रेल्वेच्या देखभाल-दुरुस्ती कामाला विरोध नाही. मात्र सणासुदीच्या दिवसांतील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने त्याचा विचार करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Ganesh Chaturthi 2026 : अवघा ठाणे जिल्हा भक्तिमय झाला, शहरासह ग्रामीण भागांत गणरायाचं आगमन
‘टीसी’ गेले कुठे?
एसी लोकलसह साध्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात रविवारी मोठी गर्दी उसळली होती. अनेक जण विनातिकीट असल्याचे दिसून येत होते. एरवी एसी लोकलमध्ये फिरणारे टीसी रविवारी दिसेनासे झाले होते. यामुळे एसी लोकलमधील टीसी गेले कुठे, अशी प्रवाशांकडून विचारणा होत होती. उत्सवापूर्वीच्या रविवारीएसीसह साध्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातही घुसखोरांची चलती असल्याचे चित्र होते.
