• Fri. Jul 24th, 2026

    जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

    जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

    Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात २४ जुलै रोजी हवामान कसं असेल?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत रात्री झालेल्या पावसानंतर गुरुवारी सकाळी पालघर जिल्ह्याचा इशारा अद्ययावत करून रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला. दुपारी ठाणे जिल्ह्यासाठीही रेड ॲलर्ट जारी करण्यात आला. पालघर जिल्ह्यात दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर कायम होता.

    मुंबईत आज, शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, २३ ते ३० जुलै आणि ३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कमी राहू शकतो. कोकण विभागातही या दोन्ही आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

    ठाणे, पालघर, रायगडला आज ऑरेंज अॅलर्ट

    पूर्व व पश्चिम अशा विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांचे क्षेत्र (शिअर झोन) दक्षिण गुजरातवर सक्रिय असल्याने त्याचा परिणाम पालघर, उत्तर मुंबईवर झाला. हा प्रभाव आज पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

    पुण्यात सर्वदूर कोसळधारा

    घाट माथ्यावर जोरदार, जिल्ह्यात मुसळधार तर शहरात गुरुवारी सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या धारा कोसळल्या. शहरात सकाळी दहा वाजेपर्यंत सोसाट्याचे वार वाहत होते, दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. घाट माथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. शहरात दिवसभरात कमाल २७.२ आणि किमान २३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून, दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहील, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

    Maharashtra TimesNashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’

    महाराष्ट्रात कसं असं असेल हवामान?

    नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपलं होतं आणि गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरेल. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात शुक्रवारी, २४ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि किनारपट्टी भागात उसळणाऱ्या लाटा व सोसाट्यांच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा