• Sat. Jun 6th, 2026
    Rail Update: CSMT मेगा ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला; ‘या’ एक्स्प्रेस गाड्या आता दादर-ठाण्यापर्यंतच धावणार!

    Mumbai CSMT Station Redevelopment: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासामुळे रेल्वेने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी १० दिवस वाढवला आहे. त्याचा परिणाम आता लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा आणखी काही दिवस मनस्ताप वाढणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकासासाठी सुरू असलेला ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेकडून आणखी १० दिवस वाढवण्यात आला आहे. त्यामुळे काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे शेवटचे स्थानक तात्पुरते बदलण्यात आले असून या गाड्या आता दादर किंवा ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

    २९ मेपासून प्रवास अर्धवट; लोकलचा घ्यावा लागणार आसरा

    रेल्वेने जाहीर केलेल्या या नवीन नियमांनुसार, हा बदल २९ मेपासून पुढील १० दिवस लागू राहणार आहे. त्यामुळे उत्तर, दक्षिण किंवा पश्चिम भारतातून मुंबईत सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना आता दादर किंवा ठाणे स्थानकावरच उतरावे लागणार आहे. तिथून पुढे मुंबईत इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांना लोकल रेल्वेचा आसरा घ्यावा लागणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्याने आधीच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असताना, या नवीन बदलामुळे प्रवाशांचे हाल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

    प्लॅटफॉर्म १६ आणि १७ वर मोठं काम सुरू

    रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाकडून सीएसएमटी स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या परिसरात पायाभूत सुविधा उभारणे, जुन्या ट्रॅकचा पाया मजबूत करणे आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह इतर महत्त्वाची तांत्रिक कामे केली जात आहेत. हे काम अत्यंत क्लिष्ट आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने हा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक वाढवणे रेल्वेला अपरिहार्य झाले आहे.

    Maharashtra TimesTamil Nadu Politics : 47 आमदारांच्या पक्षाला मोठं भगदाड! 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, CM विजय यांच्या TVKमध्ये दाखल

    प्रवाशांना रेल्वेचे मोठे आवाहन

    या मेगा ब्लॉकच्या कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये तात्पुरते मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी किंवा प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या गाडीचे अचूक स्टेटस आणि अंतिम स्थानकाची माहिती रेल्वेच्या अधिकृत हेल्पलाईन किंवा अ‍ॅपवर तपासून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा