• Mon. Sep 14th, 2026

Maharashtra Rain News : बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, 20 जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, राज्यातला शेतकरी सुखावला; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Updates : राज्यात गणपतीच्या पहिल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.

महाराष्ट्र मुंबई पाऊस बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असताना त्यापूर्वी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला दणक्यात सुरुवात झाली आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा चांगलाच जोर

आज मुंबईकर बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतील. मात्र, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची खरेदी करताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचे चांगलाच जोर धरला आहे. आज पहाटेपासून मुंबईत सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका गणपतीचे मंडप आणि रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सजावटीला बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesGaneshotsav 2026: पेणच्या 15 लाख गणेशमूर्ती यंदा विदेशात; समुद्र, हवाईमार्गे प्रवास, काळजीपूर्वक पॅकिंग

कल्याण-डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपली

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपली आहे. तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसानं शहरात पुनरागमन केलं आहे. तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे नागरिक त्रस्त होते, अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिक हैराण झाले होते, या पावसाने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक सुखावले असले तरी यामुळे गणपतीच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे.

विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात11 ते 14 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. तर 20 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

Maharashtra TimesManoj Jarange Chalo Mumbai: मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा; मराठा आरक्षणासाठी 19 सप्टेंबरपासून आंदोलन, कुठे-कुठे मुक्काम?

सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

वसई-विरार शहरात रविवारी सकाळपासूनच पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वसई, नालासोपारा आणि विरारमधील बहुतेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यातच गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून उद्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे आजपासूनच शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाच्या मूर्ती मंडपात आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

आज आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत

दुसरीकडे हजारो घरगुती गणेशभक्तही आज आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, पावसाच्या जोरदार सरींमुळे बाप्पाला घरी आणताना आणि सजावटीची कामे पूर्ण करताना भक्तांची चांगलीच तारांबळ उडत असताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी मूर्ती आणि सजावटीचे साहित्य पावसापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन वापरण्याची तयारी केली आहे. गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि पावसाचा जोर अशा दुहेरी परिस्थितीत वसई-विरारकरांमध्ये आनंदासोबतच थोडीशी चिंताही पाहायला मिळत आहे.