Nanded Accident : मुलांच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच वडिलांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना किनवटमध्ये घडली. ज्या मंडपात हळद लागणार होती, तिथूनच वडिलांची अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
एका दिवसावर दोन मुलांचं लग्न असताना वडिलांचा अपघतात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : घरात मुलांच्या लग्नाची धामधूम… लग्नासाठी नातेवाईकही जमले होते. मंडपदेखील टाकण्यात आला होता. इकडे हळदीची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे काही कमी पडू नये म्हणून बापाची धावपळ सुरू होती. सनई-चौघड्यांचा निनाद होत होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. लग्नाच्या कामानिमित्त बाहेर गेलेल्या पित्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. विशेष म्हणजे, ज्या मंडपामध्ये मुलांच्या हळदीचा कार्यक्रम होणार होता, त्याच मंडपातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबावर आली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. सदाशिव गोविंदा घमेवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दोन मुलांचे लग्न, घरात आनंदाचे वातावरण
मृत सदाशिव गोविंदा घमेवाड (वय 55) हे किनवट तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. आज, 28 एप्रिल रोजी सचिन आणि उद्धव घमेवाड या दोन मुलांचे लग्न होणार होते. घरात लग्न असल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि लग्नाची तयारी सुरू होती.
हळदीच्या तयारीसाठी गेले, पण काळाने घात केला
हळदीचा कार्यक्रम होणार असल्याने कार्यक्रमात काही कमी पडू नये यासाठी सदाशिव हे किनवट येथे गेले होते. काम आटोपून ते किनवटहून कोठारी गावाकडे परत निघाले. शहरातील आयटीआयसमोर पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर त्यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि अन्य सोपस्कारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस जमादार ओमकार पुरी आणि आशिष डगवाल यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लग्नघरात आनंदाऐवजी शोककळा
दरम्यान, अपघाताची बातमी घरी पोहोचताच लग्नाच्या घरात एकच टाहो फुटला. आनंदाने न्हाऊन निघालेलं घर क्षणात दुःखाच्या सागरात बुडालं. सनईचे सूर थांबले आणि तिथे फक्त हुंदके ऐकू येऊ लागले. ज्या हातांनी मुलांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या होत्या, त्याच मुलांवर आज आपल्या पित्याला खांदा देण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेमुळे घमेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा