• Wed. Sep 9th, 2026

कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्याकडून आढावा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 8, 2026

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ (विमाका) : उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ व संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ व पारदर्शकपणे करण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी आज मार्गदर्शन केले.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. विभागीय आयुक्त कार्यालयातून न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, सह आयुक्त मंजूषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ पडताळणी, प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती तसेच स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या भूमिकेचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र प्रकरणांची कार्यवाही नियमानुसार करण्याबाबत न्यायमूर्ती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीत शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच ग्राम व तालुका पातळीवरील यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उपलब्ध नोंदींचा प्रभावी वापर करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील प्रमाणपत्र प्रक्रियेची सद्यस्थिती आणि करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed