Pune Junnar Accident : पुण्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मित्राने मित्राला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. पण दुर्दैवाने दोन्ही चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला आहे.
शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : खेळता-खेळता काही क्षणातच सगळं संपलं… मित्र पाण्यात बुडताना पाहून दुसऱ्या निरागस मित्राने वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दोन्ही चिमुकल्यांना पाण्याने गिळून टाकलं. बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 28) दुपारी घडलेल्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. सोहम जयसिंग नवले (वय १२) आणि विघ्नेश महेश पवार (वय १०) ही त्या दुर्दैवी घटनेतील दोन नावे… खेळताना अचानक मृत्यूच्या दारात जावं लागेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम शेततळ्याच्या पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. आपल्या मित्राला बुडताना पाहून विघ्नेश क्षणाचाही विचार न करता त्याच्या मदतीला धावला. पण मदत करताना तो स्वतःच अडचणीत सापडला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही खोल पाण्यात बुडाले… आणि काही क्षणातच सगळं संपलं.
दोघांनाही मृत घोषित केले
ही संपूर्ण घटना सोबत असलेल्या आणखी एका मुलाच्या डोळ्यांसमोर घडली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने गावात धाव घेतली आणि माहिती दिली. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. सुमारे १५ मिनिटांत सोहमला बाहेर काढण्यात आले, तर विघ्नेशचा शोध घेण्यासाठी तब्बल दोन तास लागले. दोघांनाही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान दोघांनाही मृत घोषित केले.
ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
मित्रासाठी प्राण पणाला लावले
दरम्यान, “मित्रासाठी जीव पणाला लावला… पण दोघेही परतले नाहीत,” या भावनिक वास्तवामुळे संपूर्ण बल्लाळवाडी गाव शोकसागरात बुडाले आहे. खेळकर वयातच दोन निरागस जीव हरपल्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले आहे. ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर पालक आणि समाजासाठीही मोठा धडा ठरत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा