• Sun. Jun 7th, 2026
    आमच्या घरात खूप पैसे, खरातच्या पोराने तोंड उघडलं, मशिनवर कॅश मोजायचे; मुंबईच्या आलिशान हॉटेलात कायम ‘सूट’ बुक

    Nashik Crime : मुंबईतील एका आलिशान हॉटेलात खरातसाठी कायम ‘सूट बुक’ असायचा. तेथून लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन व्हायचे, अशी माहिती समोर आली आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, येवला : दैवी शक्ती, तंत्र-मंत्र आणि भविष्यवाणीच्या दाव्यातून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला गर्भपाताच्या गुन्ह्यात ‘एसआयटी’ने अटक केली असताना त्याच्या संपत्तीची तपासणी सुरू झाली आहे. त्यातच खरातसाठी कायम मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलात ‘सूट बुक’ असायला व तेथूनच अनेक महत्त्वपूर्ण ‘व्यवहार’ सुरू होते. यासह खरातच्या मुलानेही ‘एसआयटी’समोर ‘आमच्या घरात खूप पैसे असायचे’, असा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

    काय आहे प्रकरण?

    महिलांवरील लैंगिक अत्याचार, शस्त्राचा गैरवापर, गुंगीकारक औषधांसह बेहिशेबी मालमत्ता याबाबत भोंदूबाबा खरात प्रकरणात ‘एसआयटी’ने तपास केल्यानंतर आता कुकर्मांसह गर्भपाताची ‘चिकित्सा’ सुरू केली आहे. गर्भपाताच्या गुन्ह्यात खरातला नाशिक सत्र न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यासह खरातची बेहिशेबी मालमत्ता, जंगम व स्थावर मालमत्ता, आर्थिक व्यवहारांबाबतही ‘एसआयटी’ कसून चौकशी करीत आहे. त्यानुसार खरातसोबत विशेष जवळीक असलेल्या एका व्यक्तीभोवती लवकरच कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील एका आलिशान हॉटेलात खरातसाठी कायम ‘सूट बुक’ असायचा. तेथून लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन व्हायचे, असे कळते.

    मुलाचे धक्कादायक खुलासे

    धक्कादायक बाब म्हणजे, खरातचा मुलगा हर्षवर्धन यानेही ‘एसआयटी’समोर खुलासे केले आहेत. ‘आमच्या घरात खूप पैसे असायचे. त्यांचा व्यवहार कसा आणि कुठे व्हायचा हे माहीत नाही. परंतु, रोख रक्कम बरीच असायची. हे पैसे मोजण्यासाठी मशिनचा वापर व्हायचा’, असे खरातच्या मुलाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे खरातमार्फत ‘हवाला रॅकेट’ सुरू होते, असाही संशय पुन्हा बळावला आहे. त्याच्या लैंगिक अत्याचारासह भोंदूगिरीचा तपास सुरू असताना आर्थिक व्यवहारांबाबतही पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

    दोन्ही पतसंस्था रडारवर

    खरातने काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही स्थानिक पतसंस्थांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी खरात विश्वस्त मंडळावर असलेल्या दोन पतसंस्थांच्या संचालकांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे पतसंस्थेतून दिलेले कर्ज, तेथील आर्थिक व्यवहार आणि इतर मुद्दे संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

    समता पतसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर असल्यामुळे कुणीही खाते उघडून व्यवहार करू शकतो. अशोक खरात याच्याशी संबंधित सर्व खाती कायदेशीर पूर्तता करूनच उघडण्यात आली आहेत. त्या खात्यांद्वारे झालेले व्यवहारही नियमांनुसारच झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी पत्राद्वारे मागवलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत सादर करण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार संबंधित खाती तत्काळ गोठवण्यात आल्याचे संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले. संस्थेच्या कोपरगाव येथील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोयटे बोलत होते. यावेळी सरव्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते. समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असून, राज्य फेडरेशनच्या एका सामाजिक कार्यक्रमात अशोक खरात व त्यांची भेट झाल्याचे ते म्हणाले.

    खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांकडून गोपनीयता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संस्थेकडून त्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. एक लाखाहून अधिक खातेदारांमध्ये एखाद्या खात्याची उलाढाल वेगळी ओळखणे सहज शक्य नसते, मात्र संबंधित सर्व व्यवहार व कागदपत्रे नियमबद्ध आहेत. मे २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत हे व्यवहार झाले असून, सध्या संबंधित चार खात्यांमध्ये सुमारे तीस लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. कोणतेही खाते बनावट नसून निधीचा उगम व व्यवहारांचा तपशील पोलिस तपासातूनच स्पष्ट होईल. बहुतेक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याची माहितीही कोयटे यांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा