Nashik Unseasonal Rain Loss: कांद्यासारख्या नगदी पिकांसह फळबागादेखील संकटात सापडल्या असून, अवकाळीच्या तडाख्यात यंदा आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सुमारे एक लाख हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले. अवकाळी पावसाने बळीराजाचे अर्थचक्रच बिघडवले आहे.
२२ हजार हेक्टरवरील कांदा भुईसपाट
जिल्ह्यात बुधवार पाठोपाठ गुरुवारीदेखील अवकाळी पाऊस बरसला. या संकटास तोंड देताना बळीराजा हवालदिल झाला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा जिल्ह्यातील एकूण ३४९ गावांना बसला. ३९ हजार ८१४ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात २८ हजार ३६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक फटका बागायत क्षेत्राला बसला. बागायत क्षेत्रातील सुमारे २५ हजार ९१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यात एकट्या कांद्याचे क्षेत्र २२ हजार ७२६ हेक्टर आहे. त्यासोबतच २८४ हेक्टरवरील मकाही उद्ध्वस्त झाला आहे.
डाळिंब, द्राक्ष अन् पेरुचेही नुकसान
फळबागांच्या बाबतीत जिल्ह्यातील दोन हजार ४४८ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांना मोठा फटका बसला. यामध्ये डाळिंब बागांचे १७५८ हेक्टर क्षेत्रावर, तर द्राक्षांचे ६४१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. ४३ हेक्टर क्षेत्रावरील पेरुबागांनाही या पावसाचा फटका बसला. तालुकानिहाय पाहणीत बागलाण आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे सर्वाधिक रौद्ररूप पाहायला मिळाले. बागलाण तालुक्यातील ८० गावांमधील २१ हजार ३५८ शेतकऱ्यांचे १८ हजार १०२ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. यात १५ हजार हेक्टरवरील कांद्याचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात ३० गावांमधील तीन हजार ४०५ शेतकऱ्यांच्या एक हजार ७४७ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. याशिवाय निफाड तालुक्यात पाच हजार ३३० हेक्टर आणि सिन्नर तालुक्यात एक हजार ७२८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. मात्र, नांदगाव, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि चांदवड या तालुक्यांमध्ये नुकसानीची कोणतीही नोंद झालेली नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने हा नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. आता प्रशासकीय पातळीवरून पुढील हालचाली सुरू झाल्या असून, शेतकऱ्यांचे लक्ष मदतीकडे लागले आहे.
दिंडोरी तालुक्यात वादळी पावसाने शेडनेट उद्ध्वस्त
दिंडोरी : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, तर शेतीपिकांसह नर्सरी व घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिंडोरी येथील शेतकरी मंगेश शिंदे यांच्या कृषितीर्थ ऊस रोपवाटिकेला फटका बसला. जोरदार वाऱ्यामुळे नर्सरीवरील शेडनेट उडून गेले असून, ऊसाच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच खेडगाव येथील राजीवनगर परिसरात काही घरांची पत्रे वाऱ्याने उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले. दरम्यान, काढणीस आलेल्या गव्हासह कांद्याच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला. द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Dindori Accident : नियतीचा क्रूर खेळ, स्नेहसंमेलनावरुन येताना कार विहिरीत कोसळली, चिमुरड्यांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दिंडोरीत अंत
नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा : भुजबळ
येवला : जिल्ह्यासह येवला तालुक्यात गुरुवारी (दि.२) झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला नुकसानीचे जलद पंचनामे करून शासनास अहवाल देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेतला. द्राक्षबागा, कांदा, मका तसेच काढणीस आलेल्या गव्हाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेशही भुजबळ यांनी दिले असून, या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
Nashik Crime : नाशकात पुन्हा एका ऑफिस बॉयने मालकाला अडकवलं; 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग केसमध्ये मोठा ट्विस्ट
खासदार भगरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
निफाड : नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कांदा, द्राक्ष, गहू, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामी उत्पन्न उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. भगरे यांनी नुकसानग्रस्त भागात त्वरित आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची मागणी केली. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना अंतरिम आर्थिक मदत द्यावी, तसेच नुकसानभरपाईचे दर वाढवावेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पीक विमा दावे जलदगतीने निकाली काढावेत, कर्जफेडीस मुदतवाढ व व्याजमाफी द्यावी आणि जास्त नुकसान झालेल्या भागांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
