• Wed. Sep 9th, 2026

पशुपालकांसाठी माहितीचा खजिना; पशुसंवर्धन विभागाचे ‘महापशुधन वार्ता’ ई-मासिक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 27, 2026
पशुपालकांसाठी माहितीचा खजिना; पशुसंवर्धन विभागाचे ‘महापशुधन वार्ता’ ई-मासिक – महासंवाद

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.
पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली. मे २०२५ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता. आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकामध्ये राज्यातील विविध भागातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय दौरे व उपक्रम यांच्या माहितीचा समावेश असतो. त्यामुळे हे मासिक केवळ माहितीपर न राहता मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत हे मासिक प्रकाशित केले जाते. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक महाविस्तार अॅपमध्येही वाचता येणार आहे.
मार्च २०२६ च्या अकराव्या अंकात नुकत्याच परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या महापशुधन एक्स्पो विषयाची माहिती, छायाचित्रे देण्यात आली आहेत. त्याशिवाय आत्मनिर्भर गोशाळा व नैसर्गिक शेतीची गरज, लडाखमधील पशुधनासाठी महाराष्ट्राची मदत, नंदुरबार जिल्ह्यातील दुग्धविकास क्षेत्राला मिळणार चालना आदी विविध विषयांवरील माहितीचाही समावेश आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या मासिकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “पशुपालन व दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विभागामार्फत प्रकाशित होणारे हे मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. महापशुधन वार्ता हे डिजिटल ई मासिक पशुपालक शेतकरी बांधवांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे,” असे आवाहन त्यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनीही या मासिकाच्या वाचनाचे आवाहन करताना सांगितले की, “राज्यात गुणात्मक पशुधनांची पिढी तयार करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रभावी धोरण राबवित आहे. त्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘महापशुधन वार्ता’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पशुपालन क्षेत्रात गुणवत्ता, उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. हे मासिक डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी मोफत उपलब्ध असून, पशुपालकांपर्यंत थेट शास्त्रीय व व्यवहार्य माहिती पोहोचवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मासिकाचा लाभ घ्यावा.”
पशुपालकांना नियमित मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विभागाअंतर्गत सुरू असलेले कार्य, मोहिमा, उपक्रम व योजना यासह तांत्रिक माहिती या मासिकाच्या माध्यमातून पशुपालकांपर्यंत पोचविले जाते. हे मासिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक वाचकांनी ते डाउनलोड करून वाचावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीपकुमार देवरे यांनी केले आहे.
0000
नंदकुमार वाघमारे/ वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed