नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी थेट फोटोंचे पुरावे सादर करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत गोडसे, दीपक केसरकर आणि रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी एसआयटीकडे चौकशीची मागणी केली आहे.
“बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आधी हे फोटो पाहावेत”
सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, “काल कुणीतरी एक बोलघेवड्या बाई ‘ताज’ हॉटेलचे संदर्भ देऊन बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी आज पुराव्यासकट बोलत आहे. माझ्याकडे असलेले फोटो हे केवळ योगायोग नाहीत. यात अतुल सावे दिसतायत, याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असे माझे म्हणणे नाही, पण या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
हेमंत गोडसे आणि एमआयडीसी कनेक्शन
सुषमा अंधारे यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांचे काही फोटो माध्यमांना दाखवले. त्या म्हणाल्या, “हेमंत गोडसे एका फोटोत भूमिपूजन करताना दिसत आहेत. समोर नारळ आहे आणि त्यांच्यासोबत या प्रकरणातील मुख्य संशयित खरात दिसत आहे. हे भूमिपूजन सिन्नर एमआयडीसीशी संबंधित आहे. जर हे केवळ सामाजिक उपक्रम होते, तर मग तिथे एमआयडीसीचा सर्व स्टाफ काय करत होता? याचे उत्तर आता त्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी दिले पाहिजे.”
Narhari Zirwal: विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य; नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत!
“दीपक केसरकरांचीही एसआयटी चौकशी व्हावी”
या प्रकरणात माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव घेत अंधारे यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी एका बॅनरचा फोटो दाखवत प्रश्न उपस्थित केला की, “सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचा तो बॅनर आहे. तिथे शालेय शिक्षण मंत्र्यांचे काय काम? शिक्षण खात्याचा संबंध एमआयडीसीशी कसा काय आला? मी यासंदर्भात एसआयटीला (SIT) पत्र दिले असून केसरकरांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या नेत्याबद्दल मी गॅरंटी देते, पण तुम्ही या नेत्यांना कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. मी अजून संशोधन करेन आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाईन. मला नाशिकच नाही, तर इतरही अनेक गोष्टींचे संशोधन करायचे बाकी आहे.”
चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही अंधारे यांनी निशाणा साधला. “चाकणकर म्हणतात की त्या केवळ सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या. पण एका फोटोत कॅबिनेट मंत्री शांत उभे आहेत आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, बाजूला खरात उभा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ हे आता स्पष्ट व्हायला हवे,” असे त्या म्हणाल्या.
या सर्व फोटोंचे इनपुट आपण एसआयटीकडे सोपवले असून, या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ कोण आहे हे समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
