Rupali Chakankar Reaction After Resignation : रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात याला आपल्या कुटुंबाने गुरु मानलं होतं. त्याची वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नव्हती. त्याचे घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर आपल्याला धक्का बसला, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
“शिवनिका संस्थान ट्रस्ट जे महादेवाच्या मंदिराचे ट्रस्ट आहे, या ट्रस्टवर मी प्रदेशाध्यक्ष असून सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझ्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर या ट्रस्टवर होते. या ट्रस्टवर असल्यानंतर मी राज्य महिला आयोगाची अध्यक्षा झाली. माझा या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 ला संपलेला आहे. खरंतर समाजामध्ये आयुष्य जगत असताना कुणाला ना कुणाला गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं. काही वेळा तिथे होत असलेला कार्यक्रम मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमाचा असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही उपस्थित राहायचो”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
‘पाद्यपूजेचा व्हिडीओ पाच-सहा वर्षांपूर्वीचा’
“यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलंय, त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली त्याप्रमाणे मी आणि माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. पाच-सहा वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण लोकांच्या संपर्कात असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या कोणतीही कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत ते भविष्यात कसे वागतील याची आपल्याला कल्पना नसते”, असं चाकणकर यांनी म्हटलं.
“मला ही घटना समजली त्यावेळेस मला धक्का बसला. मी सुरुवातीला ट्विट देखील केलं. या देवस्थान ट्रस्टची माझा कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नव्हती. या प्रकरणी पोलिसांनी खोलवर आणि निष्पक्ष तपास करावा हे मी परवाच सांगितलं आहे. त्यासाठी मी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यांना मी तपासाबाबत पत्र दिलं. त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनाही तपासाबाबत पत्र दिलं. यानंतर मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली”, असं त्यांनी सांगितलं.
‘खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती’
“आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो. आपली एक अध्यात्मिक श्रद्धा आणि भावना असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्यामुळे आमची श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. म्हणून आम्ही कुटुंब या देवस्थानशी जुळलो होतो. त्याची दुसरी बाजू आम्हाला माहिती नव्हती. वर्षातील काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधी आम्ही तिथे राहयचो”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Rupali Chakankar Resignation : ‘वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने राजीनामा देते’, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
‘आरोपीचं घाणेरडं कृत्य, कुठेही समर्थन करणार नाही’
“जे घडलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. अतिशय घाणेरडं कृत्य आहे. आम्ही त्याचं कुठेही समर्थन करणार नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करावा. आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे”, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
