पुणे सोलापूर महामार्गावर धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांबरोबर अपघात झाला आहे. अनेकांना किरकोळ अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री नऊची वेळ… महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ होती. पण लोणी स्टेशन जवळील हाडके पेट्रोल पंपासमोर काळ दबा धरून बसला होता. एका अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणावर ऑइल सांडल्याने रस्त्यावर तेलाचा थर साचला होता. अंधार असल्याने आणि वाहनांचा वेग असल्याने दुचाकीस्वारांना हा धोका लक्षात आला नाही. जसा दुचाक्यांचे टायर त्या ऑइलला स्पर्श करायचं, तसं चालकाचं नियंत्रण सुटायचं आणि गाडी थेट रस्त्यावर घसरायची, सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हेच मोठं नशीब. पण अनेक दुचाकींचे हेडलाईट फुटले, इंडिकेटरचा चक्काचूर झाला आणि काही जण किरकोळ जखमी झाले.
नागरिकांचा संताप
या घटनेनंतर महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवत इतरांना इशारा दिला, तर काहींनी जीव मुठीत धरून गाड्या बाजूला घेतल्या. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर रस्त्यावर वाळू पसरवून ऑइलचा तवंग काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली. पण प्रश्न उरतोच की, इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑइल सांडूनही संबंधित वाहनचालकाला कसं कळलं नाही?
Ashok Kharat : अशोक खरात महिलांना कशाप्रकारे जाळ्यात अडकवायचा? FIR मध्ये A टू Z खुलासा, काळ्या कृत्यांची माहिती उघड
रस्त्यावर असा धोका असताना प्रशासकीय यंत्रणा वेळेवर का पोहोचली नाही? स्थानिक नागरिक आता संतप्त झाले असून, “अशा बेजबाबदार वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी लावून धरत आहेत.
आधीच पुण्यातील वाहतूक आणि अपघातांचे सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्यात गुरुवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर हा प्रकार घडल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
