राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र देत अशोक खरात प्रकरणात सखोल तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस महासंचालकांना पत्र दिले आहे. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी आणि आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश द्वावे, असं म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत पत्राचा फोटो शेअर केला आहे.
रुपाली चाकणकर यांचं संपूर्ण पत्र
“महोदय, नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन) याने एका 35 वर्षीय महिलेवर गेल्या तीन वर्षापासून वारंवार बलात्कार केल्याची आणि तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे 58 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्राप्त झाली आहे.”
“महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. सदर प्रकरण हे केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने या तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) नियुक्त केले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. महिला आयोगाच्या वतीने आपणास कळविते की,
१. प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले
संबंध पाहता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थापित विशेष तपास पथक (SIT) ने निपक्षपातीपणे तपास करावा.
२.पीडितांचे संरक्षण: सापडलेल्या 58 व्हिडिओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
३. कठोर कायदेशीर कारवाई आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील, तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.
४. कालबद्ध तपास : सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र (Charge sheet) लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे, ही विनंती.”
