• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat: तुमचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो राजेंद्रकडे आहेत; मेसेज येताच अशोक खरात घाबरलेला, २ महिन्यांपूर्वी तक्रार

    Nashik Crime: महिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड बदनामी होईल, अशी भीती घालत प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी खरात याच्याकडे करण्यात आली होती.

    तुमचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो राजेंद्रकडे आहेत; मेसेज येताच अशोक खरात घाबरलेला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक: महिला बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या कॅप्टन अशोक खरात याने अडीच महिन्यांपूर्वी सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाणे येथे दोन जणांविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

    या प्रकरणी दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) आणि राजेंद्र अशोक जासुद (रा. पुणे) यांच्याविरोधात वावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात याने २९ डिसेंबर २०२५ रोजी ही तक्रार दिली होती. खरात हा रिअल इस्टेट व्यवसायात असून, त्यांची ओळख दिनेश परब याच्याशी २०१० पासून असल्याचे सांगितले आहे. २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान परब याने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधत ‘तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो राजेंद्र जासुद याच्याकडे आहेत,’ असे सांगून काही फोटो पाठवले. हे फोटो मॉर्फ केलेले असल्याचा दावा खरात यांनी केला आहे.

    हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास मोठी बदनामी होईल, असे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मुलीच्या लग्नामुळे व्यस्त असल्याचे सांगूनही संशयितांनी पैशांसाठी सतत तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास झाल्याने अशोक खरात याने अखेर वावी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

    पोलिसांनी दोघांविरोधात खंडणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, तसेच पुढे काय कारवाई झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा