• Fri. Mar 20th, 2026

    Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांनीही तंत्र-मंत्र विद्येचा वापर केला, पीडित महिलेनंच सांगितलं; फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

    Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांनीही तंत्र-मंत्र विद्येचा वापर केला, पीडित महिलेनंच सांगितलं; फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

    पुणे: नाशिक येथील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसंच रुपाली चाकणकर यादेखील तंत्र-मंत्र विद्येचा वापर करत होत्या, असा धक्कादायक दावा एका पीडित महिलेच्या हवाल्याने करत अंधारे यांनी चाकणकरांच्या अटकेची मागणी केली आहे.

    रुपाली चाकणकर यांच्यावर आरोपांची सरबत्ती करताना पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “अशोक खरात याचे प्रकरण पुढे आणणाऱ्या ‘खबरदार पुढारी’ वृत्तपत्राच्या पत्रकारावर गुन्हे दाखल करावेत, यासाठी रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला होता आणि याबाबतचे पुरावे आता समोर आले आहेत. ज्योतिष सांगणं आणि तंत्र-मंत्र करणं, काळी जादू करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. काळी जादू करणं हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघण करणारं आहे. मी किती सुधारणावादी विचारांची आहे, हे आयोगाच्या अध्यक्षा सांगत असतात. पण वास्तव वेगळं आहे. आरोपी अशोक खरात याच्याशी माझा व्यक्तिगत संबंध नाही, असं चाकणकरांनी सांगितलं. पण खरातचे वडील वारले तेव्हा चाकणकर तिथं गेल्या होत्या, खरातच्या मुलीचे लग्न जमले तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणि रुपाली चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची कागदपत्रे मी दोन दिवसांत सर्वांसमोर आणणार आहे,” असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.

    रुपाली चाकणकरांनी स्वत:चं बोट कापलं?

    तंत्र-मंत्र विद्येचा वापर करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी आपलं बोट कापलं होतं, असा खळबळनजक आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला आहे. त्यांनी म्हटलं की, ” अशोक खरात प्रकरणातील एका पीडित महिलेशी मी काल बोलले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. पीडितेने सांगितलं की चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या. चाकणकर यांनी आपल्या हाताची अनामिका (बोट) कापली होती. तंत्र-मंत्र विद्येमध्ये हाताची अनामिक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जावहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासााठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशिभूत करण्यासाठी केला जातो. एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्ती करणे, असा या तंत्र-मंत्र विद्येचा अर्थ आहे. पीडितेने सांगितलं की हे तंत्र-मंत्र विशिष्ट वेळेत केले जाते. हे सोमवती अमावस्येला केले जाते. रुपाली चाकणकर यांचे २०२४ मधील सप्टेंबर महिन्यातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या बोटाला बॅण्डेज लावलेले दिसत आहे. २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या होती आणि त्यानंतर विविध फोटोंमध्ये चाकणकर यांच्या बोटाला बॅण्डेज दिसत आहे,” असा दावा अंधारे यांनी केला आहे.

    दरम्यान, याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना रुपाली चाकणकर या कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात आणि आपली बाजू कशी मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed