• Sun. Mar 15th, 2026

    Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव

    Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव

    Pune Feeder Bus: पुणेकरांना मेट्रो स्थानकांपासून सार्वजनिक पीएमपी सेवा असतानाच आता फीडर बससेवा सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. यासाठी महामेट्रोने खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा दिली जात असतानाच, मेट्रो स्थानकांपासून लगतच्या परिसरात पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यासाठी आता ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडूनही (महामेट्रो) चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले असून, यामुळे थेट पीएमपीला स्पर्धक सेवा निर्माण होणार आहे. त्यामुळे हा स्वतंत्र बसचा घाट प्रवाशांसाठी आहे, की ठेकेदारांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    मेट्रोचा पहिला ३१ किमीचा टप्पा पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतरही गेल्या दोन ते तीन महिन्यांत मेट्रोची प्रवासी संख्या कमी होताना दिसते आहे. प्रवाशांसाठी ‘पीएमपी’कडून मर्यादित स्वरूपात फीडर सेवा दिली जात असल्याने मेट्रोसाठीची स्वतंत्र सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोकडून पावले टाकली आहेत. खासगी ठेकेदारासमवेत सार्वजनिक खासगी भागीदारी स्वरूपात (पीपीपी) ही बससेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesNavi Mumbai Metro: तळोजा-खांदेश्वर मेट्रोसाठी 5 हजार कोटींची तरतूद, नवी मुंबईत दुसरी मार्गिका; अनेक वर्षांनंतर मंजुरी

    काय आहे प्रस्ताव?

    फीडर बस सेवेसाठी पहिल्या टप्प्यात रामवाडी स्थानकापासून खराडी आणि लोहगाव विमानतळ या दोन मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

    दोन्ही सेवा एकाच वेळी

    सध्या रामवाडी मेट्रो स्थानकापासून दर १५ मिनिटांनी विमानतळासाठी बससेवा उपलब्ध आहे; शिवाय खराडी किंवा खराडी बायपाससाठी दर पाच ते १० मिनिटांनी बस मिळू शकते. याच मार्गावर पुढे मेट्रोचा विस्तार अपेक्षित आहे.

    Maharashtra TimesPune News: शनिवारवाडा ते सारसबाग भुयारी मार्गाची शक्यता, पुण्यातील मध्यवर्ती भागातील कोंडी फुटणार; पडताळणीनंतर अंतिम निर्णय

    स्वतंत्र बससेवा कशासाठी?

    पुणे महानगर परिसरात ‘पीएमपी’कडून आत्ताही ठेकेदारामार्फत बस चालविल्या जातात. त्यामुळे महामेट्रोकडून स्वतंत्र बससेवा सुरू झाल्यास या दोन्ही सेवांची एकमेकांशी स्पर्धा होणार असून, त्यातून प्रवाशांचा फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची भीती आहे. महामेट्रोच्या फीडर सेवेसाठी त्यांनी बस उपलब्ध करून दिल्यास पीएमपी त्याचे संचलन करील, असा प्रस्ताव यापूर्वीच देऊनही स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचे प्रयोजन नक्की काय, याचा उलगडा झालेला नाही. पुणे महानगरासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच प्राधिकरण निर्माण करण्यासाठीच आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा