• Mon. Mar 16th, 2026

    भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन

    भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
     जुन्नर
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांना बंद असताना भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याची घटना शनिवारी (१४ मार्च) समोर आली. यामुळे एकच वादंग उठले असून, सामान्य भाविकांना एक न्याय आणि मंदिर पदाधिकाऱ्यांशी संबंधितांना दुसरा न्याय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही या हेलिकॉप्टरवारीची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.खासदार डॉ. दुबे हे झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने भीमाशंकर येथे आले. त्यानंतर त्यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असताना खासदारांसाठी ते खुले कसे करण्यात आले, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामागे मंदिर ट्रस्टमधील कोणाचा सहभाग आहे का, स्थानिक अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थानिक नागरिक, भाविक; तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली होती. ऐन महाशिवरात्रीच्या काळातही भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी सोडले नाही. यात्राही रद्द करण्यात आली होती. दर्शनासाठी कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत एका नेत्यासाठी मंदिर खुले केल्याने प्रशासनावर दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खासदार डॉ. दुबे हे दिल्लीच्या मर्जीतील नेते मानले जातात. यामुळे त्यांचा भीमाशंकर दौरा आणि मंदिर उघडण्यामागील कारणांबाबत वादंग सुरू झाल्याची चर्चा आहे.

    वादग्रस्त वक्तव्यांमुळे दुबे चर्चेत
    ‘मराठींना आपटून मारू, राहुल गांधी पिकनिकला येतात, मुंबईला टॅक्स देणाऱ्यांमध्ये आमचे योगदान आहे, ठाकरे परिवाराचे काही देणे नाही,’ अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे खासदार डॉ. निशिकांत दुबे चर्चेत आले होते.

    खासदार डॉ. निशिकांत दुबे भीमाशंकर दर्शनाला येणार असल्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही यासाठी परवानगी दिलेली नाही. हा प्रकार भीमाशंकर मंदिर ट्रस्टच्या कोणा व्यक्तीकडून झाला असेल किंवा काय याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed