• Wed. Mar 11th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime : माणुसकीची किंमत चुकवावी लागली; महिलेला लिफ्ट दिल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला लिफ्ट देणे दोन मित्रांना महागात पडले. महिलेने मोबाईल हिसकावला, तर तिच्या साथीदारांनी मारहाण करत युवकाच्या कानातील सोन्याची बाळी लुटली. सिडको चौकातील धक्कादायक प्रकार.

    छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको चौकात लुटमार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एका अनोळखी महिलेला मदतीसाठी कारमध्ये लिफ्ट देणे दोन मित्रांना चांगलेच महागात पडले. महिलेने कार चालकाचा मोबाईल हिसकावून पळ काढलाच, शिवाय तिच्या साथीदारांनी मध्यस्थी करणाऱ्या मित्राला मारहाण करत त्याच्या कानातील दीड तोळ्याची सोन्याची बाळीही लांबवली. सिडको चौकात रविवारी पहाटेच्या सुमारास हा थरार घडला.

    माणुसकीतून दिली लिफ्ट, पण मोबाईल हिसकावून पळाली

    या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, राहुल विद्याधर पंडित (रा. एन-२, सिडको) असे फिर्यादीचे नाव आहे. राहुल हे ८ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जयभवानी नगर चौकात कारमध्ये मित्राची वाट पाहत थांबले होते. यावेळी एक महिला ५ वर्षांच्या मुलीसह त्यांच्याकडे आली आणि तिने सिडको बसस्थानकापर्यंत सोडण्याची विनंती केली. राहुल यांनी माणुसकीच्या नात्याने तिला कारमध्ये बसवून घेतले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर त्या महिलेने राहुल यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि कारमधून उतरून धूम ठोकली.

    पाठलाग केला अन् सापळ्यात अडकले

    राहुल आणि त्यांचा मित्र सचिन नरवडे यांनी तात्काळ त्या महिलेचा पाठलाग केला. सिडको चौकात ती महिला दिसल्यानंतर त्यांनी कार थांबवून तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी तिथे आधीच दबा धरून बसलेले रोहित म्हस्के, ऋषिकेश आणि त्यांचे इतर साथीदार आले.

    Maharashtra TimesKolhapur Crime : रिक्षाचालकाला दगडाने ठेचून संपवलं; ओळख पटवणंही कठीण झालेलं, 24 तासांत कोल्हापुरात दुसरी भयानक घटना

    “महिलेला शिवीगाळ का करता?” असा बनाव रचत या टोळीने राहुल आणि त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण केली. या झटापटीत आरोपींनी राहुल यांचा मित्र मदनजीत सिंग यांच्या कानातील दीड तोळ्याची सोन्याची बाळी जबरदस्तीने हिसकावून नेली.

    पोलिसांत गुन्हा दाखल

    या प्रकरणी राहुल पंडित यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रूपाली पाटील, रोहित म्हस्के, ऋषिकेश आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा